विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर ‘ईठा’ हा नवीन चरित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लोकप्रिय लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे.

‘ईठा’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. कालच २४ जून रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. तर यातील श्रद्धाचा लूकसुद्धा व्हायरल होत आहे. श्रद्धा यामध्ये मुख्य भूमिकेत असून यामधून ती लावणी करताना दिसणार आहे. त्यामुळे ही भूमिका खऱ्या अर्थाने तिच्या करिअरला मोठं वळण देणारी ठरू शकते. पण तुम्हाला माहीत आहे का श्रद्धा कपूर ‘ईठा’ चित्रपटात साकारत असलेल्या विठाबाई नारायणगावकर नेमक्या कोण होत्या, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आणि त्यांची कारकिर्द कशी राहिली आहे? चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

वयाच्या १०व्या वर्षापासून सुरू झाला लोककलेचा प्रवास

‘ईठा’चा टीझर रिलीज झाल्यापासून याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. अशातच आता विठाबाई नारायणगावकर यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या त्यांचा संघर्षकाळ सांगताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी त्या वयाच्या १०व्या वर्षापासून नृत्य करायला लागल्या असून त्यांच्या वडिलांची परिस्थिती खूप हालाकीची होती असं सांगितलं आहे.

पंढरपूरमध्ये झालेला जन्म

१ जुलै १९३५ रोजी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे जन्मलेल्या विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशा आणि रंगभूमीशी परिचय अगदी लहानपणापासूनच झाला. त्यांचे वडील आणि काका या क्षेत्रात कार्यरत होते. दरम्यान, त्यांचे आजोबा नारायण खुडे यांनी पारंपरिक फिरता लोककलाविष्कार असलेला तमाशाचा कलापथक स्थापन केला होता. पुढे हा कलापथक त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी ‘भाऊ-बापू मांग’ या नावाने चालवला.

विठाबाईंनी लहान वयातच आपल्या कुटुंबाचा कलावारसा पुढे नेण्यास सुरुवात केली. त्यांना नृत्य आणि सादरीकरणाची विशेष आवड निर्माण झाली. लावणीची गाणी, गवळण आणि इतर पारंपरिक नृत्यप्रकारांच्या वातावरणात वाढल्यामुळे त्यांनी हे कलाप्रकार शिकण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्या रंगमंचावर उतरल्या आणि त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

लग्नानंतर आले अनेक चढ-उतार

मारुती सावंत यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि वैवाहिक जीवनही संघर्षमय राहिलं. मात्र, या अडचणींनाही न जुमानता त्यांनी आपली कलासाधना सुरू ठेवली. लावणी आणि तमाशा या लोककलांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांच्या सादरीकरणांमध्ये संगीत, नृत्य आणि कथाकथन यांचा रंगतदार संगम पाहायला मिळायचा. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोक त्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे. त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना तमाशा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

वयाच्या ६६व्या वर्षी झालं निधन

चाहत्यांनी त्यांना प्रेमाने ‘तमाशा सम्राज्ञी’ ही उपाधी दिली. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने २००६ मध्ये ‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ सुरू केला. विठाबाईंचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात समर्पण, जिद्द आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. १५ जानेवारी २००२ रोजी, वयाच्या ६६ व्या वर्षी, अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांचं महाराष्ट्रातील नारायणगाव इथे निधन झालं. ईठा या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून टीझरमध्ये विठाबाईंच्या गर्भावस्थेतील प्रसंगाची झलक दाखवण्यात आली आहे. हा प्रसंग त्यांच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाचा आणि जिद्दीचा पुरावा मानला जातो.

दरम्यान, श्रद्धा कपूरचा ईठा हा चित्रपट येत्या २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासह अभिनेता रणदीप हुडासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.