Eetha Movie Trailer release: प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित हा ईठा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ईठा सिनेमाच्या ट्रेलरची प्रदर्शित झाला आहे, हा सिनेमा थिएटरमध्ये कधी प्रदर्शित होणार आहे, याची तारीखही समोर आली आहे.
“माझा विश्वासच माझा अहंकार…”
‘ईठा’ सिनेमात श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहे. ती प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला खुल्या मैदानात झालेली गर्दी पाहायला मिळते आणि स्टेजवर ईठा लावणी सादर करत असल्याचे दिसते. नृत्याच्या विविध छटा, अवतीभोवती असणारी गर्दी, बदलणारे लूक आणि भारदस्त व्यक्तीमत्व यामध्ये पाहायला मिळते.
ट्रेलरमध्ये पुढे पाहायला मिळते की ईठा म्हणते, “तूच म्हणाला होतास ना की बघूयात काय तुटतं? माझा विश्वास की माझा अहंकार?” त्यानंतर तिथल्या स्वत:च्याच पोस्टरवर दगड मारताना दिसते. तिथे सिद्धार्थ जाधवची झलक पाहायला मिळते. पुढे स्टेजसमोर मोठी गर्दी दिसते. घुंगरू असलेले पाय दिसतात, त्यावर रक्त दिसते. त्यावेळी श्रद्धा म्हणते, “माझा विश्वासच माझा अहंकार होता. जेव्हा तो तुटला तेव्हा सगळंच तुटलं.
पुढे ईठाच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ पाहायला मिळते. त्यानंतर एक वेळ अशी येते, तेव्हा ईठा म्हणते, “नाचता नाचता मेले तर एक आदर्श होईन.”
त्यानंतर ती लावणी सादर करताना दिसते. ट्रेलरमध्ये ऐकायला मिळते की भाऊगावकर तमाशा मंडळ प्रस्तुत करणार आहेत, महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान ईठाबाई गावकर.
पुढे ईठाबाईच्या विविध लावण्या पाहायला मिळतात. शेवटी एक व्यक्ती ईठाबाईच्या कपड्यांकडे पाहून म्हणतो की ही बाई कोणत्या दशकातील कपडे घालून आली आहे? त्यावेळी त्या माणसाला ईठाबाई खडसावून सांगते, “याला नऊवारी म्हणतात. हा फक्त कपडा नाही. हा अभिमान आहे. ज्याला घालायला मिळाला तो, भाग्यवान आहे. मराठी साजाचा सन्मान आहे, ओळख आहे.”
ट्रेलरमधील संगीत, डान्स, श्रद्धाचा अभिनय, दिग्दर्शन, डायलॉग सगळंच लक्ष वेधून घेत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. तर, संगीताची धुरा अजय अतुल यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा ४ डिसेंबर २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
