Shraddha Kapoor praises boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियामार्फत ती तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी चाहत्यांसह शेअर करत असते. तिच्या साध्या राहणीमानामुळे ती अनेकांना आपलीशी वाटते. अशातच नुकतंच श्रद्धाने तिच्या बॉयफ्रेंडचं यामार्फत कौतुक केलं आहे.
श्रद्धा कपूर तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अशातच आता अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीचं सोशल मीडियावरुन कौतुक केल्याने ती चर्चेत आली आहे. श्रद्धा अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. अशातच आता राहुल मोदीच्या नवीन जाहिरातीनिमित्त तिने सोशल मीडियावर पोस्ट केलंय.
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंडचं केलं कौतुक
श्रद्धा कपूरच्या पोस्टनुसार राहुल मोदीने या जाहिरातीचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सैयारा या चित्रपटातून लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री अनित पड्डा यामधून झळकत आहे. श्रद्धाने या जाहिरातीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये शेअर करत तिने लिहिलंय की “क्युटनेस आणि सर्वोत्कृष्ट अभिनयाचं उत्तम समीरकरण म्हणजे अनित पड्डा आणि क्युटनेसवरुन आठवलं हा लेखक आणि दिग्दर्शक किती हुशार आहे”. यावेळी तिने अनित पड्डा आणि राहुल मोदीला टॅग केलं आहे.
श्रद्धा आणि राहुल यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चा २०२४ च्या सुरुवातीला सुरू झाल्या. मुंबईत डिनर डेटनंतर दोघे एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा रंगल्या. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. तरीही ते अनेकदा एकत्र दिसतात आणि श्रद्धा सोशल मीडियावर त्यांचे मजेशीर फोटो-व्हिडिओ शेअर करत असते.
काही काळ दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या अफवा होत्या. पण डिसेंबर २०२४ मध्ये श्रद्धाने राहुलबरोबर वडापाव डेटचा फोटो शेअर करत त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतरही दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले, अलीकडेच दोघे लवकरच नातं अधिकृत करतील आणि लग्न करतील, अशा अफवा पसरली होती. मात्र, श्रद्धाची मावशी आणि अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी, “खरंच, मला याबद्दल काहीच माहिती नाही,” असं सांगितलं.
श्रद्धा कपूर शेवटची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ या चित्रपटात दिसली होती. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात तिच्याबरोबर राजकुमार राव, पंकज त्रिपाठीही महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आणि जगभरात ८५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
आगामी काळात श्रद्धा ‘पहाडपंगिरा’ या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट ‘तुंबाड’चा प्रीक्वेल मानला जात आहे. याशिवाय, मराठी लोककला क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘ईठा’ या बायोपिकमध्येही श्रद्धा झळकणार आहे.
