मनोरंजन विश्वातील असे अनेक कलाकार आहेत जे महिन्याला कोट्यवधी रुपये कमावतात पण, आजही भाड्याच्या घरात राहतात. काही सेलिब्रिटी शूटिंगच्या सेटपासून जवळ पडेल अशा ठिकाणी भाड्याने घर घेतात. तर, काही कलाकारांना स्वत:चं घर खरेदी करण्यापेक्षा एअरपोर्टपासून जवळच्या परिसरात किंवा प्रवासाच्या दृष्टीने जिथे सोयीचं वाटेल अशा भागात भाड्याने राहणं योग्य वाटतं. बॉलीवूडची अशीच एक अभिनेत्री गेली काही वर्षे भाड्याने राहतेय.
गेल्या १६ वर्षांपासून ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. इतकंच नव्हे तर तिच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक ८०० कोटींहून अधिक कमाई केली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे श्रद्धा कपूर. श्रद्धाच्या ‘स्त्री २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पण, तुम्हाला माहितीये का श्रद्धा आजही मुंबईत भाड्याने राहतेय.
‘स्त्री २’च्या यशानंतर २०२४ च्या अखेरीस श्रद्धा कपूरने मुंबईतील जुहू परिसरात भाड्याने राहण्यासाठी घर घेतलं होतं. याचा भाडेकरार आता अभिनेत्रीने पुढील वर्षासाठी वाढवून घेतला आहे. प्रॉपर्टी कन्सल्टन्सी फर्म स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने जुहू येथील ‘प्राइम बीच’मधील हे अपार्टमेंट ऑक्टोबर २०२४ मध्ये भाड्याने घेतलं होतं, याची नोंदणी त्याचवेळी झालेली होती.
या जागेचं महिन्याचं भाडं ६ लाख रुपये आहे. तर १२ महिन्यांसाठी ही रक्कम तब्बल ७२ लाख इतकी होते. हे अपार्टमेंट तब्बल ३,९२८.८६ स्क्वेअर फूट आहे. या करारात चार कार पार्किंगच्या जागेचा देखील समावेश आहे. याशिवाय श्रद्धाने हा करार करताना ३६ हजार स्टॅम्प ड्यूटी आणि १००० रुपये रजिस्ट्रेशन फी दिली आहे.
जुहू हा मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित परिसर आहे. याठिकाणी अनेक कलाकारांचे बंगले, बीचफ्रंट बंगले आहेत. याशिवाय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जेव्हीपीडी रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जुहूवरून फारच जवळ आहे. म्हणूनच अनेक सेलिब्रिटी या परिसरात राहतात.
दरम्यान, श्रद्धा कपूर येत्या काही वर्षांत ‘Eetha’ ( २०२६ ) आणि ‘स्त्री ३’ ( २०२७ ) या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

