‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या श्रद्धा कपूरने ती चित्रपटांची निवड कशी करते आणि त्याचबरोबर टीकेला कशाप्रकारे सामोरे जाते याबद्दल सांगितलं आहे. सोशल मीडियावरून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना तिने याबद्दलचा तिचा अनुभव सांगत तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या, पण तिने त्या नाकारल्याचं म्हटलं आहे. श्रद्धा नेमकं काय म्हणाली जाणून घेऊ.

स्त्री २नंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या – श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरने यावेळी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ या सेशन मार्फत तिच्या चाहत्यांना तिला प्रश्न विचारायला सांगितले आणि त्यातून ती इच्छुक असलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार असं म्हटलं. यावेळी तिला यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना काय सल्ला देशील असं विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, “स्त्री २नंतर मला बरेच चित्रपट ऑफर झाले आणि भरमसाठ पैसेही मिळणार होते, पण मी ठरवलं होतं की जोपर्यंत मला चांगली कथा मिळत नाही तोपर्यंत मी कुठलाच करार करणार नाही. माझं मन मला सांगत होतं की मला संयम ठेवावा लागेल आणि मी तो ठेवला.”

श्रद्धा पुढे म्हणाली, “मला जे हवं होतं ते मिळवण्यासाठी अर्थात संयम ठेवणं कठीण होतं, पण आता मला माझा खूप अभिमान वाटत आहे की मी इतका संयम ठेवला. त्यामुळे तुम्हाला हेच सांगेन की कधी कधी तुमच्या अंतरमनाचं ऐकावं लागतं. कठीण असतं पण ते समाधानकारकही असतं.”

श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम स्टोरी

कुठला मॅनेजर नाहीये, कुठल्या एजन्सीशी जोडलेली नाहीये

श्रद्धाला पुढे ती टीकेला कशाप्रकारे सामोरे जाते असं विचारल्यानंतर म्हणाली, “हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी टीका कशी हाताळते याबद्दल सांगायचं झालं तर मी टीका हाताळतच नाही. त्यात हाताळण्यासारखं काय आहे. मला व्हॉट्सॲप हँडल करता येत नाही. नाही माझा कोणी मॅनेजर आहे. ना मी कुठल्या एजन्सीशी जोडलेली आहे. माझे मित्र, दिग्दर्शक, निर्माते मला ओरडत असतात की तू तुझा फोन चेक करत नाही. त्यामुळे मला कुठल्याही टीकेला सामोरं जायचं नाहीये. मला फक्त काम करायचं आहे आणि खूप काम करत राहायचं आहे.”

श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘ईठा’ चित्रपट येत्या ४ डिसेंबरला चित्रपटगृहात रिलीज होत आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता रणदीप हुडाही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.