प्रसिद्ध बॉलीवूड गायक अरिजीत सिंगने नुकतीच पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली. त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी साहजिकच धक्कादायक आहे. आपल्या सुमधुर गायनासाठी ओळखला जाणारा अरिजीत हा संगीतसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय गायक आहे. त्यामुळे त्याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्यानंतर असंख्य चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अरिजीतनंतर आता आणखी एका लोकप्रिय गायिकेनेसुद्धा निवृत्तीबद्दलच्या निर्णयाचे संकेत दिले आहेत.
श्रेयाने एका मुलाखतीत सांगितले की, स्टेजवर लाइव्ह गाण्याऐवजी लिप-सिंक करून गाणं सादर करणं तिला अजिबात मान्य नाही. जर भविष्यात असं करण्याची वेळ तिच्यावर कधी आली, तर ती गाणंच बंद करील. एबीपी न्यूजशी बोलताना श्रेयाने, लाइव्ह परफॉर्म करणं हे गायकासाठी खूप महत्त्वाचं आहे, असे सांगितले. तसेच यावेळी श्रेयाने अरिजीतच्या निर्णयावरसुद्धा प्रतिक्रिया दिली.
“…त्या दिवशी मी गायन बंद करीन”
श्रेया म्हणाली, “स्टेजवर गाणे गाण्यासाठी लिप-सिंक करणे ही गोष्ट मला खूप विचित्र वाटते. ज्या दिवशी मला असे करावे लागेल, त्या दिवशी मी गायन बंद करीन. त्यामुळे जोपर्यंत माझा आवाज व्यवस्थित आहे आणि माझा रोज गाण्याचा सराव सुरू आहे. तोपर्यंत मला स्टेजवर उभे राहून रसिक श्रोत्यांसाठी लाइव्ह गाणे गायला नेहमीच आवडेल. पण जेव्हा हे होणार नाही, तेव्हा मी गाणं बंद करेन.”
तसेच यावेळी तिने लाइव्ह परफॉर्म करताना गायक म्हणून एक मोठी जबाबदारी असल्याचेसुद्धा यावेळी नमूद केले. त्याबद्दल श्रेया म्हणाली, “कलाकार म्हणून आपल्या वैयक्तिक आयुष्यात काहीही सुरू असले तरी त्याचा परिणाम स्टेजवर दिसता कामा नये. संगीत हे त्यांना त्यांच्या दुःखातून आणि समस्यांतून बाहेर पडण्यास मदत करते. रसिकांकडून मिळणारे प्रेमच आम्हाला पुन्हा पुन्हा परफॉर्म करण्याची प्रेरणा देते.”
अरिजीतबद्दल श्रेया घोषाल म्हणाली…
पुढे गायिकेने अरिजीत सिंगने घेतलेल्या निर्णयाबद्दल स्वत:चे मत व्यक्त केले, असा निर्णय घेण्यासाठी खूप धाडस लागते आणि ती त्याच्या निर्णयाचा आदर करत असल्याचेसुद्धा तिने सांगितले. श्रेया म्हणाली, “कधी कधी मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो. अरिजीतने अत्यंत धैर्याने हा निर्णय घेतला आहे. आपण संगीत का करीत आहोत किंवा त्यातून काय मिळेल, याचा तो विचार करत नाही. अरिजीतला ज्या कामातून आनंद मिळतो, तेच काम तो करतो. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा संगीत हे अरिजीतसाठी मोठं आहे आणि म्हणूनच लोक त्याच्यावर इतकं प्रेम करतात.”
दरम्यान, श्रेया घोषाल हे संगीतविश्वातले मोठे नाव आहे. मराठी, हिंदीसह तिने अनेक भाषांतली गाणी गायली आहेत. त्यामुळे जवळपास प्रत्येक भाषेत तिचा चाहतावर्ग आहे. गायिका असण्याबरोबरच श्रेया अनेक रिअॅलिटी शोमधून परीक्षकाचे कामदेखील करते.
