Shreya Ghoshal on Item Songs Trolling : श्रेया घोषाल बॉलीवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. तिनं आतापर्यंत हिंदी, मराठीसह इतर अनेक प्रादेशिक भाषांत गाणी गात देशभरातील रसिक प्रेक्षकांना तिच्या आवाजानं मंत्रमुग्ध केलं आहे. पण, जे प्रेक्षक प्रेम करतात ते कधी कधी कलाकारांना ट्रोलही करतात. असंच काहीसं झालेलं श्रेयाबरोबर. तिलाही एका लोकप्रिय गाण्यासाठी ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिनं करीना कपूरच्या चित्रपटातील गाणं गायला चक्क नकार दिल्याचं म्हटलं जातं.
श्रेया घोषालनं तिच्या गाण्यामुळे झालेल्या ट्रोलिंगबद्दल स्पष्टीकरण देत तिनं काही प्रकारची गाणी न गाण्याचा निर्णय का घेतला याबद्दल सांगितलं आहे. राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत श्रेयाला तुला ‘चिकनी चमेली’च्या वेळी ट्रोल करण्यात आलेलं. तेव्हा तू काहीतरी वादग्रस्त विधानही केलेलं, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी ट्रोल झाले होते? मला तर माहीतच नाही.”
श्रेया घोषाल काय म्हणाली?
श्रेया पुढे म्हणाली, “मी प्रामाणिकपणे सांगितलेलं. ट्रोल झाले होते, असं काही नसेल. मी काही वादग्रस्त बोलले नव्हते. मी म्हणाले होते की, मी लहान मुलांसमोर ते गाणं गाऊ शकत नाही. मला नाही योग्य वाटत. पण, चिकनी चमेली अश्लील वगैरे असं काही गाणं नव्हतं. इतकाही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला नाही.”
श्रेया त्याबद्दल पुढे म्हणाली, “त्यानंतर मला तशा किंबहुना त्यापेक्षाही अधिक जास्त उच्चार न करता येणाऱ्या किंवा संकोच वाटेल असे शब्द असलेल्या गाण्यांसाठी विचारणा झालेली. चिकन बनवून खा वगैरे शब्द त्यात होते. पण, मी म्हटलं की, मी हे नाही करू शकत. पण, चिकनी चमेली या गाण्यानं मला खूप लोकप्रियता मिळाली. ते गाणं खरं तर खूप वेगळं होतं आणि तेव्हा मला तितकी अक्कलही नव्हती की, याचा काय अर्थ आहे; पण आता मी विचारपूर्वक निर्णय घेते.”
श्रेयानं उल्लेख केलेलं गाणं माध्यमांच्या वृत्तानुसार करीना कपूर व सलमान खान यांच्या ‘फेविकॉल से’ हे गाणं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.२०१२ साली आलेल्या ‘दबंग २’ चित्रटपटातील हे गाणं गाण्यासाठी ‘चिकनी चमेली’मुळे झालेल्या टीकेनंतर श्रेयानं गायला नकार दिल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, २०१२ सालीच आलेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील चिकनी चमेली हे लोकप्रिय गाणं असून, कतरिना कैफनं त्यामधून तिच्या नृत्यानं अनेकांचं लक्ष वेधलं होतं. ‘चिकनी चमेली’ हे कतरिनाच्याही हिट गाण्यांपैकी एक आहे. हृतिक रोशन व कतरिना कैफ यामध्ये मुख्य भूमिकात होते; तर अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं.
