Shreya Ghoshal on Chikni Chameli Controversy :श्रेया घोषाल बॉलीवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. तिने आतापर्यंत हिंदी मराठीसह अनेक विविध भाषेत गाणी गायली आहेत. गायिकेने तिच्या गोड आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. तिने आतापर्यंत गायलेली अनेक गाणी हिट ठरली आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘चिकनी चमेली’ हे गाणं. पण, आता गायिकेने अशी गाणी पुन्हा कधीच न गाण्याचा निर्णय घेतला आहे.
कलाकार म्हटलं की अनेक जण त्यांनी निवडलेल्या कामांबद्दल प्रतिक्रिया देत असतात. काही टीका करतात तर काही प्रशंसा करतात. श्रेयाने गायलेल्या गाण्यासाठी तिचं अनेकांनी अनेकदा कौतुक केलं आहे. पण, एकदा तिलाही टीकेला सामोरं जावं लागलेलं. गायिकेने ‘चिकनी चमेली’ हे गाणं गायल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
श्रेया घोषाल काय म्हणाली?
श्रेयाने राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. तिला ‘चिकनी चमेली’ गाण्यासाठी ट्रोल झाली होतीस, तेव्हा तू काहीतरी वादग्रस्त विधानही केलं होतंस असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी ट्रोल झाले होते? मला तर माहीतच नाही. मी प्रामाणिकपणे सांगितलेलं. ट्रोल झाले होते असं काही नसेल. मी काही वादग्रस्त बोलले नव्हते. मी म्हणाले होते की मी लहान मुलांसमोर ते गाणं गाऊ शकत नाही. मला नाही योग्य वाटत. पण, चिकनी चमेली फार अश्लील वगैरे असं काही गाणं नव्हतं.”
श्रेया याबद्दल पुढे म्हणाली, “त्यानंतर मला तशा किंबहुना त्यापेक्षाही अधिक जास्त उच्चार न करताना येणाऱ्या किंवा संकोच वाटेल असे शब्द असलेल्या गाण्यांसाठी विचारणा झालेली. पण, मी म्हटलं की मी हे नाही करू शकत. पण, चिकनी चमेली या गाण्याने मला खूप लोकप्रियता मिळाली. ते गाणं खरंतर खूप वेगळं होतं आणि तेव्हा मला तितकी अक्कलही नव्हती की याचा काय अर्थ आहे, पण आता मी विचारपूर्वक निर्णय घेते.”
श्रेया पुढे म्हणाली, “अशी काही गाणी आहेत जी मी नाकारली, पण नंतर ती सुपर हिट झाली. मी खूप कमी विचार करते. मला जर आता हे योग्य वाटतंय तर मी ते करते. वर्षभराचा प्लॅन करत नाही, पण आता माझं वेळापत्रक व्यग्र असल्याने काही वेळेला हे करावं लागतं.” पुढे तिला तू कधी मी एकाच प्रकारची गाणी करणार जसं परदेशात तिथले कलाकार करतात. असं विचार केला आहे काअसं विचारल्यानंतर ती म्हणाली, “भारतात काही लोक करत आहेत, पण माझ्यासारख्या लोकांना तर प्रेक्षकांनी घडवलं आहे. माझे माझ्या चाहत्यांबरोबर खूप चांगले संबंध आहेत.”
