Shreya Ghoshal Husband Shiladitya Mukhopadhyaya Love Story: सिनेविश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने तिच्या मधुर आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रेयाचा मोठा चाहता वर्ग असला तरी चाहत्यांनाही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही. गाण्यांमुळे चर्चेत असलेली श्रेया तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल फार कमी बोलताना दिसून येते. श्रेया घोषालने आता तिच्या पतीबद्दल सांगितले.

२०१५ मध्ये गायिका श्रेया घोषालने शिलादित्य मुखोपाध्याय यांच्याशी लग्न केले. त्यांनी प्रेमविवाह केला असून दोघांची शाळेपासून ओळख होती. आता ‘द मेल फेमिनिस्ट’ पॉडकास्टमध्ये श्रेया घोषालने तिचा पतीच्या स्वभावाबद्दल आणि घरातून मिळत असलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल सांगितले. संसार करताना एकमेकांना समजून घेणे आणि मुलाचे संगोपन करणे, यावर श्रेयाने मत व्यक्त केले आहे.

घरातील स्वतःची भांडी स्वतः घासतात – श्रेया

श्रेया घोषालने तिच्या पतीबद्दल आणि घर सांभाळण्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, मला शिलादित्य भेटले. ते संपूर्ण घराची काळजी घेतात. त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगायला आवडतं. त्यामुळे ते घरातील स्वतःची भांडी स्वतः घासतात. कधी ते स्वयंपाकघरही स्वतः स्वच्छ करतात पण हे सर्व मी केलेलं त्यांना आवडत नाही.”

पुढे श्रेयाने सांगितले की, त्या दोघांनी घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे एक पार्श्वगायिका म्हणून प्रोफेशनली काम करताना कोणतीच अडचण येत नाही. श्रेया म्हणाली, “आम्ही दोघेही दिवसभर खूप मेहनत करतो, त्यामुळे घरातील कामंही आम्ही एकत्रच करत असतो. पण आमच्यापैकी कोणीतरी कायम घरी राहिलेच पाहिजे, अशी आम्ही एकमेकांकडून अपेक्षा करत नाही. त्यांनी मला कधीच विचारले नाही की, “तू आता घरी का नाहीयेस?” त्यामुळे प्रोफेशनल कमिटमेंट आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये समतोल राखता येतो.”

कोण आहेत श्रेया घोषालचे पती शिलादित्य?

शिलादित्य मुखोपाध्याय हे तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्राशी संबंधित आहेत. ते ‘ट्रूकॉलर’मध्ये ग्लोबल हेड म्हणून काम करत होते. मोबाईल अॅप्लिकेशन, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट या क्षेत्रांत त्यांना अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी कॅलिफोर्नियातील ‘क्लेव्हरट्रॅप’ या सॉफ्टवेअर कंपनीतही काम केले आहे. सप्टेंबर २०२६ मधील माहितीनुसार ‘ट्रूकॉलर एबी’चे मार्केट कॅप ६,६९५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

श्रेया व शिलादित्य यांचे २०१५मध्ये झालेले लग्न

शाळेपासून श्रेया व शिलादित्य यांची ओळख आहे. दोघेही लहानपणापासून जवळचे मित्र होते. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जवळपास दहा वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केले आणि मीडियापासून त्याचे नाते लपवून ठेवले. यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ रोजी केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये विवाह केला. २०२१ मध्ये श्रेया आणि शिलादित्य आई-बाबा झाले. त्यांच्या मुलाचं नाव देवयान आहे.