Shreya Ghoshal revealing hair care secret : लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने तिच्या सुमधुर आवाजाने आतापर्यंत अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. तिने आतापर्यंत अनेक भाषेतील गाणी गायली आहेत. अशातच गायिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार श्रेया घोषाल सध्या तिच्या कॉन्सर्ट टूरमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. नुकतंच तिने लंडनच्या O2 एरिनामध्ये प्रेक्षकांसमोर गाणी सादर केली. या कार्यक्रमादरम्यान १४ एप्रिल रोजी ब्रिटीश वोगने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्येही ती दिसली. या व्हिडिओमध्ये तिने ती तिच्या केसांची काळजी कशी घेते याबद्दल सांगितलं आहे. ‘अगर तुम मिल जाओ’ आणि ‘बैरी पिया’सारख्या गाण्यांसाठी ओळखली जाणारी श्रेया या व्हिडिओमध्ये कंबरेपर्यंत लांब केसांसह दिसली. त्यामुळे आता तिचा व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.
काय आहे श्रेयाच्या दाट केसांमागचं रहस्य?
तिच्या या लूकने सोशल मीडियावरही सगळ्यांचं लक्ष वेधलं. चाहत्यांनी तिच्या परफॉर्मन्सबरोबर तिच्या स्टेजवरील आकर्षक लूकचंही कौतुक केलं. खरंतर श्रेया तिच्या केसांसाठी जी गोष्ट वापरते ती जवळपास प्रत्येक भारतीयांच्या घरात वापरली जाते. संवादादरम्यान मुलाखत घेणाऱ्याने श्रेयाला विचारलं, “तुझे केस इतके सुंदर आणि दाट कसे राहतात?” त्यावर ती लगेच म्हणाली, “इंडियन नुस्खा… नारळ तेल!”
श्रेया घोषालने लंडनमधील तिच्या हाऊसफुल कॉन्सर्टमध्ये दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून श्रेयाने त्यांच्या काही गाजलेल्या गाण्यांचे सादरीकरण केले. श्रेया घोषालने ‘दम मारो दम’ सारखी १९७० च्या दशकात गाजलेली गाणी तसेच ‘अभी ना जाओ छोड़ कर’ हे लोकप्रिय रोमँटिक गाणं सादर केलं.
या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओंमध्ये श्रेया आशा भोसले यांच्या कायम राहणाऱ्या योगदानाबद्दल बोलताना दिसते. एका व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की, या दिग्गज गायिकेने संगीत क्षेत्राला खूप काही दिलं आहे आणि त्या नेहमीच संगीतप्रेमींच्या मनात जिवंत राहतील. दरम्यान, श्रेया घोषाल अनेकदा असे दौरे करत असते आणि तिच्या गायनाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकत असते. त्यामुळे गायिकेचा चाहतावर्गसुद्धा खूप मोठा आहे.
