The India Story Movie Release Date : ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीत चर्चेत आहे. या चित्रपटात हिंदी व मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आणि लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. नुकतंच सोमवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

या घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘द इंडिया स्टोरी’ची टॅगलाईन अशी आहे की, हा चित्रपट भारतातील न ऐकलेल्या रहस्याचा उलगडा करणार आहे. हा चित्रपट नेमका थिएटरमध्ये कधी प्रदर्शित होणार, ते जाणून घेऊया…

‘द इंडिया स्टोरी’ कधी प्रदर्शित होणार?

श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांचा ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार होता. मात्र पोस्ट-प्रोडक्शनच्या कामामुळे त्याची रिलीज पुढे ढकलण्यात आली. आता या चित्रपटाला नवी रिलीज डेट मिळाली आहे. याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर दिली आहे.

तरण आदर्श यांनी ‘द इंडिया स्टोरी’चे काही नवीन पोस्टर्सही शेअर केले आहेत. त्यांनी सांगितले की, श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांचा बहुचर्चित ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा पॅन इंडिया चित्रपट असून हिंदीसह दक्षिणेतील विविध भाषांमध्येही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे. ‘द इंडिया स्टोरी’ची रिलीज डेट समोर आल्यानंतर चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चांगली कामगिरी करू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

या चित्रपटांत दिसणार श्रेयस

अभिनेता श्रेयस तळपदेच्या आगामी चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. फक्त ‘द इंडिया स्टोरी’च नाही, तर या यादीत दोन मोठ्या कॉमेडी चित्रपटांचाही समावेश आहे. त्यामध्ये ‘वेलकम टू जंगल’ आणि ‘गोलमाल ५’ यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात श्रेयस या सर्व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करताना दिसणार आहेत.

दरम्यान, ‘द इंडिया स्टोरी’मधून मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं रंजक ठरेल.