अभिनेता श्रेयस तळपदे सध्या त्याच्या आगामी ‘द इंडिया स्टोरी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये श्रेयससह लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल मुख्य भूमिका साकारणार आहे. अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, कीटकनाशकांचा अतिवापर यामुळे जनतेच्या आरोग्यावर विशेषत: लहान मुलांवर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय याचं वास्तव या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा चित्रपट येत्या २४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. अन्नपदार्थांमधील भेसळ आणि हॉटेलातील अस्वच्छतेविरोधात तुकाराम मुंढेनी राज्यभरात कारवाई सुरू केली आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहनही मुंढेंनी केलं आहे.

IAS तुकाराम मुंढे यांची भेट घेतल्यावर काजल अग्रवालने सविस्तर पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. काजल लिहिते, “सरांना भेटून खरंच खूप छान वाटलं. सर, करत असलेल्या कामाचा मला नेहमीच आदर वाटतो. या भेटीदरम्यान, त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा याचं मी आवर्जून कौतुक केलं. पण, या चर्चेदरम्यान त्यांनी दिलेलं एक उत्तर माझ्या कायम लक्षात राहणार आहे. सर म्हणाले, प्रामाणिकपणा आणि निष्ठा या गोष्टी माझ्या कामाचा एक भाग आहेत…आणि मुळात हे माझ्या DNA मध्येच आहे. तुम्ही या गोष्टींकडे काहीतरी ‘असाधारण’ म्हणून पाहत असाल तर, यावरूनच प्रामाणिकपणा, निष्ठा किती दुर्मिळ झालीये हे कळून येतं. हीच अलीकडची दुर्दैवी परिस्थिती आहे.” त्यांचं हे उत्तर ऐकून माझ्याही मनात अनेक विचार आले.”

“आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी दृढनिश्चयाने योग्य ती गोष्ट करायची… अशा प्रेरणादायी व्यक्तीला मी भेटले. सरांसारखे लीडर्स आपल्याला जाणीव करून देतात की, सचोटीने वागणं हा विशेष गुण नसून, ही प्रत्येकाच्या आयुष्यातली फार सामान्य गोष्ट असायली हवी. प्रत्येकाने असंच खरेपणाने वागलं पाहिजे.”

“योगायोग म्हणजे, आमच्या ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) या चित्रपटातून सुद्धा हाच संदेश देण्यात आला आहे. अन्नभेसळ, कीटकनाशकांचा अतिवापर आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे. आपल्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या घटनांकडे फक्त मूकपणे पाहणं हे आपल्याला ग्राहक म्हणून परवडणारं नाहीये.”

“सर, तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. तुम्हाला अधिक बळ मिळो… तुम्ही करत असलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. भारताला तुमच्यासारख्या अनेक लीडर्सची गरज आहे.” असं काजलने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. श्रेयसने सुद्धा काजलची ही पोस्ट रिशेअर केली आहे.

kajal agarwal
अभिनेत्री काजल अग्रवालची पोस्ट

दरम्यान, यापूर्वी सुद्धा श्रेयस तळपदेने तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचं कौतुक केलं होतं. तसेच त्याने वैयक्तिक आयुष्यात डेअरी प्रोडक्ट्सचा वापरही अत्यंत कमी केला आहे. तर पालेभाज्या सुद्धा नीट स्वच्छ धुवून वापरा असं आवाहन श्रेयसने नागरिकांना केलं आहे.