Subhash Ghai post for Shreyas Talpade: मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिवंत आणि प्रभावी अभिनय ही तर श्रेयसची ओळख बनली असून, त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता दिग्गज दिग्दर्शक सुभाष घई यांनी श्रेयसच्या अभिनय आणि कामाचे कौतुक केले आहे.
सुभाष घई यांनी इन्स्टाग्रामवर श्रेयसचा फोटो शेअर करीत त्याच्याबरोबर काम केल्याचा अनुभव सांगितला आणि त्याचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “श्रेयसचा ‘इक्बाल’ सिनेमा असो, ‘अपना सपना मनी मनी’ असो, ‘गोलमाल’ असो किंवा ‘इंडिया स्टोरी’ असो… श्रेयस तळपदे हा मुंबईतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक असून, त्याच्याकडे अनेकदा इंडस्ट्रीनं दुर्लक्ष केलं.”
त्यानं आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला – सुभाष घई
त्यांनी पुढे लिहिले, “हो, श्रेयस तळपदे हा असा अभिनेता आहे, ज्यानं आपल्या अभिनयाची वेगवेगळी रूपं दाखवली आहेत. ‘इक्बाल’ सिनेमात एका मूकबधिर क्रिकेटपटूची भूमिका साकारून त्यानं आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला; तर ‘अपना सपना मनी मनी’सारख्या विनोदी चित्रपटातून बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली.”
सुभाष घई यांनी पुढे लिहिले, “सध्या आमच्या एका ‘कोर्ट-ड्रामा’ चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. यावेळी त्यानं सेटवर केलेला अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार अभिनय पाहून तर मी थक्क झालो. श्रेयस, तू पुन्हा ‘मुक्ता आर्ट्स’मध्ये परतल्याबद्दल तुझे धन्यवाद आणि खूप खूप स्वागत! यापुढे तुला असेच अनेक दमदार सिनेमा मिळावेत, हीच इच्छा आहे. नेहमी सुखी राहा.”
संकर्षण कऱ्हाडेची इन्स्टाग्रामवर पोस्ट
श्रेयस तळपदेचे बॉलीवूडमधील दिग्दर्शकांनी कौतुक केल्याने मराठी कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत लिहिले, हे खरेच आहे. “श्रेयस भावा, मला तुझ्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो, आय लव्ह यू….” तर अभिजीत खांडेकरने रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

श्रेयस तळपदेने व्यक्त केली कृतज्ञता
सुभाष घई यांच्य पोस्टवर श्रेयस तळपदेने कमेंट करीत कृतज्ञता व्यक्त केली. त्याने लिहिले, “मी अजूनही इथे काम करतोय, यासाठी तुमचे खूप आभार. तुम्ही दिलेलं प्रोत्साहन, आशीर्वाद आणि संधींमुळे मला नेहमीच पुढे जाण्याची आणि अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. ‘मुक्ता आर्ट्स’ हे माझ्यासाठी नेहमीच माझं घर राहिलं आहे आणि आपल्याच घरी परतणं ही तर खूप भावनिक गोष्ट असते. मी केलेल्या ज्या सीनचे तुम्ही कौतुक करताय, खरे तर तो चांगल्या पद्धतीनं लिहिल्यामुळे आणि शूटिंगआधी दिलेल्या योग्य सूचनांमुळे शक्य झाला आहे. सर, तुमचे खूप आभार आणि धन्यवाद.”
दरम्यान, २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘इक्बाल’ सिनेमात श्रेयस तळपदेने मुख्य भूमिका साकारली होती. ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या इक्बाल खान या तरुण क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. त्याचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी; तर त्याची निर्मिती सुभाष घई यांच्या ‘मुक्ता आर्ट्स’ने केली होती. ‘इक्बाल’ला २००५ सालचा ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट’ या श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
