श्रेयस तळपदे सध्या त्याच्या ‘मर्दिनी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने या चित्रपटाची निर्मिती केली असून यामध्ये मराठीतील लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. याचनिमित्ताने फराह खानने त्याला भेट दिली असताना त्याने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर फराह खान आपल्या घरी आल्यानंतर श्रेयस व त्याची बायको दिप्ती तळपदे यांनी तिचा पारंपरिक पद्धतीने पाहुचणार केला.
फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवरील व्लॉगमुळे अनेकदा चर्चेत असते. ती विविध कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देते. अनेकदा कलाकार मंडळींबरोबर ती विविध पदार्थही बनवताना दिसते. अशातच आता श्रेयसच्या घरी गेली असतानासुद्धा ती त्यांच्यासाठी खास पदार्थ बनवून घेऊन गेली आणि तळपदेंच्या घरी बनलेल्या अस्सल मराठमोळ्या पदार्थांचाही आस्वाद घेतला.
फराह खान व श्रेयस यांनी यावेळी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाच्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी श्रेयसने त्याला शाहरुख खान व फराह खानने मुंबईत पहिलं घर घेण्यासाठी कशी मदत केली याबद्दल सांगितलं. तर फराहनेसुद्धा त्याच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी ‘मर्दिनी’ चित्रपटातील कलाकार प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी हेसुद्धा आले होते. शेवटी सगळ्यांनी एकत्र जेवण करत फराह खानने बनवलेल्या आणि दिप्ती तळपदेने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
श्रेयसच्या बायकोने मराठमोळ्या पद्धतीने केला फराह खानचा पाहुणचार
फराह खान घरी आल्यानंतर दिप्तीने खास मासे घालून त्याचा सार केला होता. ज्याचं फराहने खूप कौतुक केलं. तर तीसुद्धा त्यांच्यासाठी कोलंबी फ्राय घेऊन गेली होती. यावेळी व्हिडीओमधून फराहने श्रेयसच्या मोठ्या आणि सुंदर अशा घराची झलकसुद्धा दाखवली आहे. व्हिडीओच्या शेवटी फराह खान घरी आल्यानिमित्ताने श्रेयसच्या पत्नीने दिप्तीने फराहला हळद-कुंकू लावून आणि ओटी भरून तिचा पांरपरिक पद्धतीने पाहुणचार केला. तर तिला सुंदर असे कानातलेसुद्धा भेट म्हणून दिले.
दरम्यान, श्रेयस तळपदेने फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनीत व निर्मित ओम शांती ओम या चित्रपटात काम केलं होतं. यासह त्याने फराह खानचा नवरी शिरीष कुंदर दिग्दर्शित ‘जोकर’ चित्रपटातही काम केलं.
