कार्तिक आर्यन आऊटसाइडर असला तरीही अगदी काही वर्षांतच त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या अभिनेता त्याच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. कार्तिकने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून हा त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वांत आव्हानात्मक चित्रपट असल्याचं अभिनेत्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. 'चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट भारताचे पहिले पॅराऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी पॅराऑलम्पिकच्या सुवर्णपदावर आपलं नाव कोरलं होतं. १४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मराठी पार्श्वभूमी असल्याने या चित्रपटामध्ये अनेक मराठमोळे कलाकार झळकले आहेत. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवीने 'चंदू चॅम्पियन’ चित्रपटात मुरलीकांत यांच्या आईची भूमिका साकारली आहे. याशिवाय अभिनेता श्रेयस तळपदेने सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हेही वाचा : “माधुरी अभिनेत्री सर्वांसाठी आहे पण, माझ्यासाठी…”, लग्न अन् संसाराविषयी डॉ. नेनेंनी मांडलं मत, म्हणाले… श्रेयसने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेता लिहितो, "नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चंदू चॅम्पियन’ चित्रपटात मला इन्स्पेक्टर सचिन कांबळेची लहानशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ज्यावेळी कबीर भाईंनी ( दिग्दर्शक कबीर खान ) मला या चित्रपटाची गोष्ट सांगितली, तेव्हा सुरुवातीला मला खरंच आश्चर्य वाटलं होतं आणि आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश लोक या खऱ्या आयुष्यातील चॅम्पियनला ओळखत नाहीत याची खंत देखील वाटली. मला सचिन कांबळे ही भूमिका दिल्याबद्दल कबीर भाईंचे खूप खूप आभार." "माझा या भूमिकेसाठी विचार केल्याबद्दल छाब्रा यांचे देखील मनापासून आभार. कधी कधी मलाच आश्चर्य वाटतं की, तू माझा या भूमिकेसाठी कसा विचार केलास पण, तू योग्य निर्णय घेतलास…त्यासाठी तुझे आभार आय लव्ह यू डार्लिंग. आता शेवटी कार्तिक आर्यनबद्दल सांगायचं झालं, तर तू खरा चॅम्पियन आहेस. तू खूप खरेपणाने 'चंदू'ची ही भूमिका साकारली आहेस. बायोपिकमध्ये काम करणं हे कधीच सोपं नसतं. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तू संपूर्णपणे झोकून देऊन काम केलंस…हा 'चंदू चॅम्पियन’ चित्रपट आणि तुझे भविष्यातील सगळे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरोत हीच शुभेच्छा! 'चंदू चॅम्पियन’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. नक्की पाहा…ही सुंदर कलाकृती पाहणं चुकवू नका" अशी पोस्ट श्रेयस तळपदेने शेअर केली आहे. हेही वाचा : सोनाली कुलकर्णीने पाहिलं प्रिया-उमेशचं नवं नाटक ‘जर तरची गोष्ट’; प्रतिक्रिया देत म्हणाली, “आजच्या काळातलं…” दरम्यान, श्रेयसच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मराठीसह हिंदी कलाविश्वात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजारपणानंतर आता पुन्हा एकदा अभिनेता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही महिन्यांत त्याचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.