Sachin Pilgaonkar Shares emotional post for daughter Shriya Pilgaonkar: अभिनेत्री श्रिया पिळगांवकर नुकतीच ‘मिर्झापूर’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. श्रियाने या सिनेमात स्वीटी गुप्ता ही भूमिका साकारली आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे सगळीकडे कौतुक होत आहे. या सगळ्यात श्रियाचे वडील म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

“तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू असंच कायम राहू दे”

सचिन पिळगांवकर यांनी काही फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. सचिन पिळगांवकर यांनी श्रियासाठी लिहिले, “खरं तर स्वीटी आमचं प्रेम आहे. चीयू (Cheeyu) तुला मोठ्या स्क्रीनवर पाहताना खूप आनंद झाला. तुझे दोन्ही सिनेमे थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहेत आणि त्यासाठी मला तुझा अभिमान वाटतो.”

पुढे त्यांनी लिहिले, “मिर्झापूर सिनेमाला प्रेक्षकांचा ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे, त्यासाठी संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन! आता ‘हैवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.”

शेवटी त्यांनी श्रियाला उद्देशून लिहिले, “मेहनत कर आणि अशीच नेहमी आनंदी, हसतमुख राहा. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू असंच कायम राहू दे”, असे लिहीत सचिन पिळगांवकर यांनी श्रियाचे कौतुक केले, तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. शेवटी त्यांनी श्रियाला टॅगही केले आहे.

सचिन पिळगांवकरांनी ही पोस्ट शेअर करताना काही खास फोटोही पोस्ट केले आहेत. मिर्झापूर व हैवान या दोन्ही सिनेमांतील काही सीनचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. तसेच, दोन्ही सिनेमांची पोस्टर्स शेअर केली आहेत. तसेच, कुटुंबाबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. एका व्हिडीओमध्ये ते सुप्रिया पिळगांवकर यांच्याबरोबर सिनेमा पाहत असल्याचे दिसत आहे. तसेच, दोन्ही सिनेमांतील गाण्यांचेही व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

सचिन पिळगांवकर यांच्या पोस्टवर श्रियाने लव्ह यू, असे लिहीत प्रेम व्यक्त केले आहे. त्याबरोबरच अनेक कलाकार आणि चाहत्यांनीदेखील श्रियाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, हैवान हा सिनेमा ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता हैवान या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.