स्वरा भास्करने दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावत’मधील सीनवर भाष्य केल्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. स्वरा भास्करने जौहर करणाऱ्या महिलांनी एका भ्याड कृत्याला शरणागती पत्करल्याचं म्हटलं होतं. आता अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने स्वरा भास्करच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘पद्मावत’मधील हा सीन चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आला आहे. या दृश्यात राणी पद्मावती आणि इतर राजपूत स्त्रिया शत्रूच्या पुढे जुकण्याऐवजी एकत्रितपणे अग्नीत प्रवेश करतात. युद्धात पुरुषांचा पराभव झाल्यानंतर स्त्रियांनी आपला सन्मान आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जौहर केल्याचं या दृश्यातून दाखवण्यात आलं आहे.असं म्हटलं जातं.

श्रियाची प्रतिक्रिया

श्रियाने ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “२०२६ मध्ये आपण १००, २०० किंवा ५०० वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक वातावरणात राहणाऱ्या लोकांचा विचार करू शकत नाही किंवा त्यांचं त्या काळातील वागणं आजच्या दृष्टिकोनातून योग्य-अयोग्य ठरवू शकत नाही. त्या काळातील लोकांची मूल्यं काय होती, त्यांना काय करायचं होतं किंवा त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे दबाव होते, हे आपण आज ठरवू शकत नाही. काळ, परिस्थिती आणि मानवी जीवनातील बदलांनुसार प्रत्येक संस्कृती विकसित होत असते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट काळातील लोकांची मानसिकता गृहीत धरणं योग्य नाही. जो काळ आजपेक्षा पूर्णपणे वेगळा होता, त्याबद्दल सरसकट चर्चा किंवा निर्णय देण्यावर माझा विश्वास नाही.”

स्वरा भास्कर काय म्हणालेली?

स्वरा भास्करने ‘पद्मावत’ प्रदर्शित झाल्यानंतर तिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना पत्र लिहिलं होतं. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात स्वरा या पत्राबद्दल बोलली. यावेळी तिने ‘पद्मावत’ आणि चित्रपटात दाखवण्यात आलेल्या जौहरच्या दृश्याबाबत चिंता व्यक्त केली.

तिने म्हटलं, “मी हा चित्रपट पाहत होते आणि त्यात ८०० महिला जौहर करताना दाखवल्या आहेत, जो या कथेचा एक भाग आहे. ते दृश्य पाहताना माझ्या मनात विचार आला की, देव न करो, पण जर मी बलात्कारातून वाचलेली व्यक्ती असते, तर हा चित्रपट मला काय सांगत असता? की सन्मानासाठी मी आयुष्य संपवावं. आपल्या समाजात बलात्काराच्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणावर घडत असताना, आपण महिलांना हा संदेश देऊ इच्छितो का? बलात्कारातून वाचलेल्या महिलांना आपण असं सांगू इच्छितो का की, तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही? तुम्ही खरंच धाडसी आणि सन्माननीय महिला असता, तर तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवलं असतं, असं आपण म्हणत आहोत का? बलात्कार म्हणजे आयुष्याचा शेवट आहे, असं आपल्याला म्हणायचं आहे का?”.

ती पुढे म्हणाली, “एक दृश्य पाहून मला खूप राग आला. मी म्हटलं, छी! त्या दृश्यात एका गर्भवती महिलेच्या पोटाचा क्लोज-अप दाखवला आहे. तुम्ही असं म्हणत आहात का की, तिच्या पोटात असलेलं बाळ मुलगी असेल, तर तिला जन्माला येण्याचा अधिकार नाही? कारण पुढे एखाद्या मुस्लीम शासकाकडून तिच्यावर बलात्कार होऊ शकतो? मला याचा खूप राग आला. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर मी म्हटलं, हे खूप भयंकर आहे.”

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटात दीपिका पदुकोणने राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती. तर शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट तेव्हा प्रचंड मोठ्या वादात अडकला होता. मात्र नंतर चित्रपटाच्या नावात बदल करुन तो रिलीज झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.