मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर असतानाही आई होण्याचा निर्णय घेत करिअरमधून ब्रेक घेतला आणी वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष केंद्रीत केलं. सध्याचं ताजं उदाहरण म्हणजे दीपिका पादुकोण, कतरिना कैफ या अभिनेत्री. तर अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना मातृत्व अनुभवायचं आहे आणि त्या याबद्दल मोकळेपणाने बोलतातही. यापैकीच एक म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासन. श्रुती हासननेही आईपण अनुभवण्याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबद्दलही सांगितलं आहे.

श्रुती हासनने तिला PCOS असल्याचं सांगत यामुळे मातृत्वाबद्दल तिच्या मनात निर्माण झालेल्या विचारांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. आता ४० वर्षांची असलेल्या श्रुतीला वयाच्या अवघ्या १४व्या वर्षीच डॉक्टरांनी गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते, असं सांगितलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेला हा इशारा अनेक वर्षे तिच्या मनात राहिला. श्रुती हासनने जैविक मूल होण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली असून, दत्तक घेण्याचाही पर्याय खुला असल्याचं सांगितलं आहे. सोहा अली खानला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने सांगितलं की, जैविक पद्धतीने आई होणं तिच्यासाठी कदाचित सोपं नसेल, या विचारानेच ती मोठी झाली. मात्र, नंतर तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञाबरोबर झालेल्या चर्चेनंतर मातृत्वाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन बदलू लागला.

१४व्या वर्षीच सांगितलेलं आई होणं कठीण

वयाच्या १४व्या वर्षीच श्रुती हासनला सांगण्यात आलं होतं, “गर्भधारणा होणं कठीण असेल” PCOS संदर्भातील तिच्या सुरुवातीच्या अनुभवाबद्दल बोलताना श्रुती हासनने सांगितलं की, एकेकाळी मातृत्व तिच्यासाठी जवळपास अशक्य असल्याचंच तिला सांगण्यात आलं होतं. श्रुती म्हणाली, “मला सुरुवातीपासूनच सांगण्यात आलं होतं की आई होणं, हे जवळपास विसरूनच जा. मी १४ वर्षांची असल्यापासूनच मला सांगितलं होतं की आई होणं हे कठीण असेल, अम्मा.” श्रुतीसाठी वर्षानुवर्षे मनात रुजलेला हा विचार हळूहळू एक गृहीतकच बनला होता. भविष्यात गर्भधारणेचा विचार करता येईल, असं मानण्याऐवजी कदाचित आपल्याला कधीच आई होता येणार नाही, असं तिला वाटू लागलं होतं.

मात्र, स्त्रीरोगतज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू केल्यानंतर तिचा हा विचार बदलला. श्रुतीने सांगितलं की, डॉक्टरांनी PCOS मुळे येणाऱ्या अडचणी नाकारल्या नाहीत; मात्र त्यांनी हा विषय अशा पद्धतीने समजावून सांगितला की, भीतीपेक्षा शक्यतांकडे पाहण्याची तिला संधी मिळाली. “तुला आई व्हायचं असेल तर आपण मार्ग नक्की शोधू” असं तिला सांगण्यात आलं. श्रुती म्हणाली, “पण त्यांनी मला हे का शक्य नाही, यामागचं कारण अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं. त्यांनी माझा विचारच बदलून टाकला. त्या खूप सुंदर पद्धतीने म्हणाल्या की, तुला आई व्हायचं असेल आणि जेव्हा तू त्यासाठी तयार असशील, तेव्हा आपण नक्कीच मार्ग शोधू.”

अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, वय किंवा PCOS म्हणजे मातृत्वाच्या शक्यतेला पूर्णविराम देणारी गोष्ट नाही, हे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे किशोरवयापासून मनात असलेल्या अनेक गैरसमजांचा तिला पुन्हा विचार करता आला. यावेळी तिने उशिरा आई झालेल्या महिलांचाही उल्लेख केला. श्रुती म्हणाली, “आता तुम्ही पाहता की कॅमेरून डियाझ ५३व्या वर्षी आई झाली. माझे डॉक्टर माझ्याशी अशा पद्धतीने बोलतात, याचा मला खूप आनंद आहे.” श्रुतीसाठी या संवादाचं महत्त्व लगेच आई होण्याचा निर्णय घेण्यात नव्हतं. तिला मातृत्व हवं आहे की नाही, हे ठरवण्याआधीच त्याची शक्यता मनातून नाकारण्याची गरज नाही, हे समजणं तिच्यासाठी महत्त्वाचं ठरलं.

मूल दत्तक घेण्याबद्दल श्रुती हासची प्रतिक्रिया

श्रुती हासनने हेही सांगितलं की, तिच्यासाठी मातृत्व म्हणजे केवळ जैविक मूल होणं नाही. दत्तक घेण्याचाही ती विचार करू शकते, असं अभिनेत्रीने स्पष्ट केलं. श्रुती म्हणाली, “मी तिला हेही सांगितलं की, मी दत्तक घेण्यासाठीसुद्धा तयार आहे. मला खरंच फक्त आई व्हायचं आहे.” त्याचवेळी, जैविक मूल होण्याची शक्यता तिच्यासाठी उपलब्ध असेल, तर ती त्याचाही विचार करू इच्छित असल्याचं श्रुतीने सांगितलं.