Shweta Bahchchan had crush on Salman Khan : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं एकेकाळी अफेअर होतं. ते वेगळे होऊन दोन दशकांहून जास्त काळ झाला आहे, तरीही त्यांच्याबद्दल आजही चर्चा होत असते. ९० च्या दशकात सलमान खान अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचा क्रश होता. यात अमिताभ बच्चन यांची लाडकी लेक आणि ऐश्वर्या रायची नणंद श्वेता बच्चन हिचाही समावेश होता. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये श्वेता बच्चनने स्वतः याचा खुलासा केला होता. श्वेताने सांगितले की, आई-वडिलांसोबत शूटिंग सेटवर जाताना तिला सलमान प्रचंड आवडू लागला होता.

अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चनने फिल्म इंडस्ट्रीत करिअर केलं नाही. मात्र ती लाइमलाइटमध्ये असते. ती बॉलीवूड पार्ट्यांना आणि कार्यक्रमांना हजेरी लावत असते. करण जोहरसह इतर काही सेलिब्रिटी श्वेता बच्चनचे खूप जवळचे मित्र आहे. श्वेता लहान असताना तिच्या आई-वडिलांबरोबर चित्रपटाच्या सेटवर जायची जिथे अनेक स्टार्स तिचे मित्र झाले. श्वेताला तरुण असताना सलमान खान खूप आवडायचा. वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड अर्थात सलमान खान तिचा क्रश होता.

श्वेता बच्चनने दिली होती कबुली

श्वेता बच्चनने एकदा भाऊ अभिषेक बच्चनबरोबर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने सलमान खानवर क्रश असल्याची कबुली दिली होती. श्वेता अनेकदा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबरोबर शूटिंग सेटवर जायची, त्याचदरम्यान सलमान तिला आवडू लागला.

सलमान खानची टोपी घालून झोपायची श्वेता बच्चन

करणने श्वेताला हॉटनेसनुसार काही अभिनेत्यांना रँक करण्यास सांगितलं होतं. याचं उत्तर देताना श्वेताने सर्वात आधी सलमान खानचं नाव घेतलं होतं. तिला सलमानचं इतकं वेड होतं की ती त्याची ‘मैंने प्यार किया’ मधील टोपी घालून झोपायची. ही टोपी श्वेतासाठी तिचा भाऊ अभिषेकने आणली होती.

दरम्यान, सलमान खान व ऐश्वर्या राय हे नात्यात येण्यापूर्वीच श्वेता बच्चन हिचं लग्न झालं होतं. १९९७ मध्ये निखिल नंदा व श्वेता बच्चन यांचं लग्न झालं व त्यांना नव्या नवेली नंदा व अगस्त्य नंदा ही दोन अपत्ये आहेत. दुसरीकडे सलमान व ऐश्वर्या जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. काही वर्षांनी ऐश्वर्या व अभिषेक बच्चन चित्रपटाच्या निमित्ताने भेटले, दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं आणि २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला आराध्या नावाची मुलगी आहे.