Siddharth Chandekar shares photo with Madhuri Dixit: माधुरी दीक्षित ही बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने १९८४ ला प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

अभिनेत्रीला १९८८ ला प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर माधुरीने मागे वळून पाहिले नाही. तिने एकापेक्षा एक चित्रपटात काम केले. यामध्ये ‘वर्दी’, ‘राम लखन’, ‘सैलाब’, ‘त्रिदेव’, ‘परिंदा’, ‘जमाई राजा’, ‘किशन कन्हैय्या’, ‘हम आपके हैं कौन’, ‘देवदास’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे. यामध्ये अनेक कलाकारांचा समावेश आहे.

माधुरी दीक्षितने आता वेब सीरिजमध्येदेखील काम करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच ती ‘मिसेस देशपांडे’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. ती सीरिअल किलर का झाली, नेहमी हसू असलेल्या चेहऱ्यामागे किती रहस्ये दडली आहेत.

तसेच, जेव्हा ती ज्या पद्धतीने खून करायची तशाच पद्धतीने दुसरे कोणीतरी खून करत होते. त्या गुन्हेगाराला सोडविण्यासाठी जेव्हा तिची मदत घेतली जाते, तेव्हा पोलिस असलेल्या मुलाबरोबर तिची भेट होते. आई आणि मुलाचे नाते आणि इतर अनेक खुलासे यादरम्यान पाहायला मिळतात. शेवटी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो.

सिद्धार्थ चांदेकर माधुरी दीक्षितबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…

या वेब सीरिजमध्ये तिच्या मुलाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने साकारली आहे. सिद्धार्थच्या तेजस या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. त्याने ज्या पद्धतीने ती भूमिका साकारली आहे, त्याची चर्चाही झाली.

आता सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर माधुरी दीक्षित दिसत आहे. फोटोमधील माधुरी दीक्षितचा लूक हा मिसेस देशपांडेमधील असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सिद्धार्थने त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

सिद्धार्थने हा फोटो एक वर्षभरापूर्वीचा असल्याचे लिहिले आहे. त्याने पुढे लिहिले, “आम्ही मिसेस देशपांडेचं शूटिंग संपवले. आम्ही ६० दिवस शूटिंग केले, त्या ६० दिवसांत मी त्यांच्याबरोबर फोटो काढण्यापासून स्वत:ला रोखले होते. पण, शेवटच्या दिवशी माझ्यातील चाहता शांत बसू शकला नाही,” असे लिहित त्याने माझा फॅन मूमेंट असेही लिहिले आहे.

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. नुकताच तो ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे.