Siddharth Jadhav On Ranveer Singh : रंगभूमी, सिनेमा, वेबसीरिज, टेलिव्हिजन अशा चारही माध्यमांमध्ये सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे त्याने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सिद्धार्थला चाहते प्रेमाने ‘आपला सिद्धू’ किंवा ‘आमचा लाडका सिद्धू’ म्हणतात; त्याची एनर्जी कमाल आहे. मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकारही आवर्जून सिद्धार्थचं कौतुक करतात. त्याने २५ वर्षांच्या कारकिर्दीत मोठमोठ्या बॉलीवूड स्टार्सबरोबरही काम केलंय. गेली अनेक वर्षे त्याची अन् रणवीर सिंहची खूप छान मैत्री आहे. सिद्धार्थ जाधवने नुकत्याच ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

सिद्धार्थ जाधवने बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंहबरोबर ‘सिम्बा’, ‘सर्कस’ अशा सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. तो रणवीरला प्रेमाने दादा म्हणतो. सिद्धार्थ याबाबत सांगतो, “मी रणवीर सरांना दादा म्हणतो. आता अलीकडेच ‘धुरंधर’ पाहिल्यावर मी त्यांना मेसेज केला होता….आमचं बोलणं असं वरचेवर होत नाही. पण, त्यांचं काम पाहिल्यावर मी त्यांना मनापासून मेसेज केला होता.”

रणवीर सिंहच्या एनर्जीचं सर्वजण कौतुक करतात. पण, त्याव्यतिरिक्त त्याच्याकडून काय शिकण्यासारखं आहे? यावर सिद्धार्थ जाधव म्हणाला, “मी हे आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं असेन की, रणवीर सिंह खूप चांगला अभिनेता आहे. मी म्हणेन तो एक Intense actor आहे.”

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “आपल्या कामात, एखाद्या भूमिकेत रणवीर नेहमी स्वत:ला झोकून देतो. पहिलं म्हणजे रणवीर आपल्या कामाशी प्रचंड प्रामाणिक आहे आणि त्याचं या अभिनय क्षेत्रावर मनापासून… खूप जास्त प्रेम आहे. मी ‘सिम्बा’, ‘सर्कस’ या सिनेमांमध्ये त्याच्याबरोबर काम केलेलं आहे. रणवीर जेव्हा सेटवर येतो… तेव्हाच एक माहोल क्रिएट होतो.”

“रणवीरचे आजवर तुम्ही अनेक सिनेमे पाहिले असतील. ‘लुटेरा’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गली बॉय’, ‘पद्मावत…’ त्याच्या प्रत्येक भूमिकेबद्दल तो किती जास्त सिरिअस असतो याची जाणीव तुम्हाला होईल. आता त्याला इंडस्ट्रीत १२ ते १३ वर्षे झाली असतील. मराठीत आम्ही अशा अभिनेत्याला ‘अरे तो भूमिकेत पूर्ण घुसून काम करतो’ असं म्हणतो. सांगायचा मुद्दा असा की, रणवीर मनापासून आपली भूमिका जगतो. मुळात इतर कलाकारांबद्दल त्याच्या मनात जराही Insecurity नाहीये. आपलं काम चांगलं करायचं…आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करायचं याकडेच रणवीरचं लक्ष असतं.” असं सिद्धार्थने सांगितलं.