मराठी सिनेसृष्टीचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव याने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीतदेखील सिद्धार्थने आपला पाय रोवला आहे. अलीकडेच सिद्धार्थने एका मुलाखतीला हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने मराठी आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीमधल्या तुलनेबद्दल भाष्य केलं आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा मुलाखतदाराने सिद्धार्थला विचारलं की, “साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘बाहुबली’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’सारखे पॅन इंडिया फिल्म्स बनले आहेत. तुम्हाला असं वाटतं का की, मराठी चित्रपटदेखील पॅन इंडिया पातळीवर दाखवले जातील.

हेही वाचा… “नकळत मला वाईट…”, अदिती राव हैदरीबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे शर्मिन सेगल झाली ट्रोल, म्हणाली…

यावर सिद्धार्थ जाधव म्हणाला, “दाखवतायत आणि तसं होतयसुद्धा. तुम्ही ज्या साउथ चित्रपटांची नावं घेतली, त्यातली ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि केजीएफ चालले; तुम्ही जेवढ्या चित्रपटांची नावं घेतली तेवढेच चित्रपट चाललेत. त्यानंतरही जे अनेक चित्रपट आले, ‘लाइगर’ आला, ‘टायगर’ आला आणि बाल कृष्णा सरांचा चित्रपट आला. चित्रपट येतायत, पण जे एक-दोन चित्रपट चालतायत त्यांच्यामध्ये तुलना करणं कठीण आहे, असं मला वाटतं.”

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “स्टायलाईज चित्रपट मराठीत बनतात, स्टायलाईज चित्रपट हिंदीत बनतात, स्टायलाईज चित्रपट साउथमध्ये बनतच होते सर. माझ्या मराठी चित्रपटाची स्पर्धा साउथशी नाही, मराठी चित्रपटाची स्पर्धा हिंदीशी नाही. आम्हाला आता जागतिक ओळख मिळतेय.”

सिद्धार्थ उदाहरण देत म्हणाला, “एकाच घरातले चार भाऊ आहेत. कोणतरी आयटीमध्ये काम करतंय, कोणतरी चित्रपटसृष्टीत, कोणीतरी उद्योजक आहे ते त्यांच्या त्यांच्याप्रमाणे यशस्वी होतायत. अशीच तर आहे मराठी, साउथ आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री.”

हेही वाचा… राहाच्या फॅशनची जबाबदारी रणबीर कपूरकडे, आलिया किस्सा सांगत म्हणाली, “मला नेहमीच असं वाटायचं…”

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “मराठी सिनेमा, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इंग्लिश भाषेत डब होऊन रीलिज होतायत.मराठी सिनेमे जसे महाराष्ट्रात रीलिज होतायत तसेच यूएस, कुवैत, दुबईमध्येदेखील रीलिज होतायत. आमचे प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, महेश मांजरेकर, संजय जाधव, केदार सर आहेत. आता महेश मांजरेकरांचा चित्रपट आहे, ‘जुना फर्निचर’ तो तुम्ही बघा. तुम्ही हा चित्रपट पाहिल्यानंतर साउथवाल्यांना बोलणार नाही की तुम्ही असा चित्रपट का नाही करत. कारण त्यांचा पॅटर्न तो आहे ना सर. मराठी सिनेमा स्टायलाईज आहे, मराठी सिनेमा इमोशनल आहे, मराठी सिनेमा कॉन्टेन्ट देणारा आहे, मराठी सिनेमा रोमॅंटिक आहे.”

“मग दुसरा जेवढ्या वेगाने पळतोय त्या वेगाने तू पळ ना, हे मला नाही आवडत. मराठी चित्रपटाची तुलना साउथ आणि हिंदीशी होणं हे मला पटत नाही. प्रत्येक सिनेमा आपआपली क्वॉलिटी घेऊन योतोय”, असंही सिद्धार्थ म्हणाला.