सिद्धार्थ जाधवने आजवर मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंह अन् सिद्धार्थची खूप छान मैत्री आहे. या दोघांनी ‘सर्कस’, ‘सिंबा’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. रणवीरने सिद्धार्थ अन् त्याच्या पत्नीला लग्नाच्या रिसेप्शनला सुद्धा आमंत्रित केलं होतं. यावेळचा खास किस्सा अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे.
सिद्धार्थ जाधवने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली यावेळी रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनचा किस्सा सांगत अभिनेता म्हणाला, “रणवीर सरांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मी गेलो होतो आणि तेव्हा मी Starstruck झालो होतो.”
Starstruck होण्याचं कारण सांगत सिद्धार्थ जाधव म्हणाला, “त्या रिसेप्शन पार्टीला सचिन तेंडुलकर सर, अमिताभ बच्चन सर, विकी कौशल सर असे सगळे स्टार्स होते. मी माझ्या पत्नीबरोबर त्या पार्टीला गेलो होतो. मी तृप्तीला दहाव्या मिनिटाला म्हणालो, चल आपण जाऊयात. मग तिने मला थांबवलं. माझं असं झालेलं की…या सगळ्या कलाकारांना मी एकत्र पाहतोय…बाबा माझे! मी एकदम भारावून गेलो होतो. कारण, अशा मोठ्या पार्टीला मी पहिल्यांदाच गेलो होतो.”
“त्यानंतर आम्ही दोघंही रणवीर सर आणि दीपिका मॅमना जाऊन भेटलो. त्या दोघांचं अभिनंदन केलं आणि मी लगेच पार्टीतून निघालो. या सगळ्या मोठ्या कलाकारांना पहिल्यांदाच पाहून मी खरंच भारावून गेलो होतो. आजवर या सगळ्या कलाकारांना मी फक्त पडद्यावर पाहिलं होतं. त्यामुळे यांना असं प्रत्यक्ष पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं” असं सिद्धार्थ जाधवने सांगितलं.
सिद्धार्थ जाधव रणवीरबरोबरच्या मैत्रीबद्दल काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता, “आमची मैत्री झाली ती रोहित शेट्टीमुळे. ‘सिंबा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही एकत्र विमानाने प्रवास करत होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली. त्यानंतर चित्रिकरणादरम्यान आमच्यात छान मैत्रीचं नातं निर्माण होत गेलं. आमची मैत्री होण्यासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे आम्ही दोघं कितीही दंगा करत असलो तरी रोहित शेट्टीला मात्र आम्ही घाबरतो, असं मनमोकळेपणाने सिध्दार्थने सांगितलं होतं.
दरम्यान, रणवीर सिंह व दीपिका पादुकोण यांचा विवाहसोहळा १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीतील ‘लेक कोमो’ या निसर्गरम्य ठिकाणी पार पडला होता. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर रणवीर-दीपिकाने मुंबईत शाही रिसेप्शन सोहळा आयोजित केला होता. या पार्टीला मनोरंजन विश्वातील कलाकारांसह अनेक दिग्गज मंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं.
