Sidharth Malhotra Father Sunil Malhotra Passed Away : आज, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी मनोरंजन विश्वातून अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांच्या निधनाच्या वृत्तानंतर आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचे वडील सुनील मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. सिद्धार्थ मल्होत्राने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मल्होत्रा हे गेल्या काही काळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल सिद्धार्थने भावुक पोस्ट केली आहे. त्याचबरोबर वडिलांचे काही जुने फोटो शेअर केले आहेत.
“माझे बाबा अत्यंत प्रामाणिक, सचोटीने जगणारे व्यक्ती होते.
ते न डगमगता तत्त्वांवर जगले. त्यांच्या शिस्तीत कठोरता नव्हती आणि ताकदीत अहंकार नव्हता. आयुष्याने त्यांची कितीही कठीण परीक्षा घेतली, तरी त्यांनी आपली सकारात्मकता कधीच सोडली नाही.
मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून समुद्रात काम करण्यापासून ते आजारपणाचा शांत धैर्याने सामना करण्यापर्यंत, त्यांनी कधीही तडजोड केली नाही किंवा आपला शालीनता गमावली नाही. स्ट्रोकमुळे जेव्हा त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला, तेव्हाही त्यांच्यातील स्वाभिमान आणि जिद्द कायम होती.
बाबा, तुमची तत्त्वनिष्ठा हाच माझा वारसा आहे.
तुमची शक्ती मला दररोज मार्ग दाखवते.
तुमच्या सकारात्मकतेने आजही या कुटुंबाला एकत्र जोडून ठेवलं आहे.
तुम्ही शांतपणे झोपेतच आम्हाला सोडून गेलात, पण तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
मी आज जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच आहे.
मी तुमचे नाव, तुमची मूल्ये आणि तुमचा वैचारिक वारसा कायम पुढे नेत राहीन.
लव्ह यू बाबा,” असं कॅप्शनमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने लिहिलं आहे.
सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट
सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या वडिलांबरोबरचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. यात त्याचे बालपणीचे फोटो आहेत. तसेच त्याचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये असतानाच्या फोटोंचाही समावेश आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते शोक व्यक्त करत आहेत. तसेच सोनम कपूर, करण जोहर, आलिया भट्ट, सयानी गुप्ता, नेहा धुपिया, मिलाप झावेरी, सोनी राजदान यांनी कमेंट करून सिद्धार्थला धीर दिला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा नेहमीच आपल्या वडिलांच्या जवळ राहिला आहे. त्याचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. सिद्धार्थने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या शिस्तप्रिय आयुष्याचे आणि यशाचे श्रेय आपल्या वडिलांना दिले होते.

