लोकप्रिय दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांसाठी आज एक आनंदाची बातमी मिळाली. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर पुढच्या महिन्यात एका गोंडस बाळा जन्म देणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण पसरलं आहे. पण अशातच सिद्धू संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पंजाब संगीत क्षेत्रातील लोकप्रिय संगीतकार व सिद्धू मुसेवालाचा जिवलग मित्र बंटी बेसवर जीवघेणा हल्ला झाला आहे. पंजाबमधील एका रेस्टॉरंट असताना बंटीवर गोळीबार केला गेला. पण या गोळीबारातून बंटी बेंस थोडक्यात बचावला. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, गोळीबारानंतर बंटी बेंसला एक धमकीचा फोन आला आणि १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. बंटीवर हा हल्ला मोहालीमधील सेक्टर-७९मध्ये झाला. या हल्ल्याची पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस याचा तपास करत आहेत.

हेही वाचा – दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई वयाच्या पन्नाशीत देणार बाळाला जन्म, पुढच्या महिन्यात पाळणा हलणार!

या’ मोस्टवॉन्टेड गँगस्टरने दिली जीवघेण्याची धमकी

या हल्ल्याविषयी बंटी म्हणाला, “गोळीबार झाल्यानंतर १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा फोन आला. जर पैसे दिले नाही तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी दिली गेली. मोस्टवॉन्टेड गँगस्टर लकी पटियाल याच्या नावाने हा फोन आला होता.” सध्या लकी कॅनडामध्ये आहे. लकी पाटियाल आणि लॉरेन्स बिश्नोई हे एकमेकांच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे. लकी हा बंबिहा गँगचं नेतृत्व करतो.

दरम्यान, बंटीचं सिद्धू मुसेवालाशी खास कनेक्शन आहे. सिद्धू व बंटी हे खूप जिवलग मित्र होते. बंटीने सिद्धूची अनेक गाणी संगीतबद्ध केली होती. एवढंच नाहीतर बंटीची कंपनी सिद्धूच्या कामाचं नियोजन करायची.