बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि मुलाखतकार सिमी गरेवाल त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिल्या. अनेक लोकप्रिय व्यक्तींबरोबर त्यांचं नाव जोडलं गेलं. गोष्टी लग्नापर्यंत पोहोचल्या होत्या असंही म्हटलं जातं. मात्र अखेर त्यांनी वेगळा मार्ग निवडला. प्रेम, लग्न, घटस्फोट आणि त्यानंतरचा त्यांचा निर्णय आजही चर्चेचा विषय ठरतो.

सिमी गरेवाल यांनी एकदा त्यांच्या आयुष्यातील एका रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी जामनगरच्या महाराजांच्या त्या प्रेमात पडल्या होत्या. या नात्याच्या आठवणी सांगताना सिमी यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, “आम्ही खूप वेगळ्या आणि भन्नाट गोष्टी करायचो. जंगलात जायचो आणि काही तासांनी परत यायचो.”

माजी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी शर्मिला टागोर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी ते सिमी गरेवाल यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. न्यूज १८च्या वृत्तानुसार त्यांच्याबरोबरच्या नात्याची आठवण सांगताना सिमी एकदा म्हणाल्या होत्या, “तो खूप मन मोकळ्या स्वभावाचा होता, माझ्याबरोबर शूटिंगलाही यायचा”. मात्र, कालंतराने मन्सूर अली पतौडी शर्मिला टागोर यांच्या प्रेमात पडले आणि सिमी यांच्याबरोबरचं त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर १९६८ मध्ये मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांनी लग्न केलं.

सिमी गरेवाल यांनी रतन टाटा यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं होतं. २०११ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, “रतन आणि माझी ओळख खूप जुनी आहे आम्ही रिलेशनशिपमध्ये होते, पण नशिबाच्या मनात काही वेगळंच होतं.” त्यांनी असंही सांगितलेलं की, दोघे लग्न करण्याचा निर्णय घेणार होते पण शेवटी त्यांचे मार्ग वेगळे झाले.

घटस्फोटानंतर पुन्हा केलं नाही लग्न

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार सिमी गरेवाल यांनी १९७० मध्ये दिल्लीतील चुनामल कुटुंबातील उद्योगपती रवी मोहन यांच्याशी लग्न केलं होतं. सिमी गरेवाल आणि रवी मोहन यांनी दहा वर्षे सुखाचा संसार केला त्यानंतर दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर सिमी गरेवाल यांनी पुन्हा कधीही लग्न केलं नाही. अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर सिमी गरेवाल यांनी ‘Rendezvous with Simi Garewal’ या लोकप्रिय टॉक शोच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला नवं वळण दिलं. या शोमध्ये त्यांचे पूर्वीचे प्रियकर रतन टाटा यांनीही हजेरी लावली होती आणि सिमी यांनीच त्यांची मुलाखत घेतली होती.

सिमी गरेवाल यांची मुलाखत घेण्याची शैली आणि नेहमी पांढऱ्या रंगाचा पेहराव करण्याची खासियत यामुळेही ‘Rendezvous with Simi Garewal’ हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी कार्यक्रमांपैकी एक ठरला. बॉलीवूडमध्ये सिमी गरेवाल यांनी ‘दो बदन’, ‘मेरा नाम जोकर’, ‘सिद्धार्थ’, ‘कर्ज’ आणि ‘चलते चलते’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. हिंदी चित्रपटांबरोबर आंतरराष्ट्रीय सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.