अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी अवघ्या १६ व्या वर्षी राज कपूर यांच्या ‘बॉबी’ या सुपरहिट चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्या ऋषी कपूरबरोबर झळकल्या होत्या. त्यावेळी त्यांची धाकटी बहीण सिंपल कपाडिया बोर्डिंग शाळेत शिकत होत्या. डिंपल चित्रपटात काम करणार असल्याचं त्यांना वर्तमानपत्रातून समजलं आणि त्या आश्चर्यचकित झाल्या होत्या.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ‘बॉबी’ प्रदर्शित झाल्यानंतर डिंपल यांच्या अभिनय कारकिर्दीला अचानक ब्रेक लागला. कारण त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर डिंपल यांनी चित्रपटांमध्ये काम करू नये, अशी राजेश खन्ना यांची इच्छा होती आणि डिंपल यांनीही त्यांचा निर्णय मान्य केला. डिंपल यांच्या पावलावर पाऊल ठेवत सिंपल कपाडिया यांनीही १९७७ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांच्या या पहिल्याच चित्रपटात ‘अनुरोध’मध्ये भावोजी राजेश खन्ना यांच्याबरोबर काम केलं होतं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर सिंपल यांनी सुमारे २५ चित्रपटांमध्ये काम केलं, पण अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी अभिनयाला रामराम केला आणि कॉस्च्युम डिझायनिंग क्षेत्रात करिअर सुरू केलं. याच क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

“मी ताईच्या हुंड्याचाच भाग होते” – सिंपल कपाडिया

डिंपल कपाडिया यांचं राजेश खन्नांशी लग्न झाल्यानंतर सिंपलही त्यांच्यासोबत राहायला गेल्या होत्या. त्या आठवणी सांगताना त्या गंमतीत म्हणाल्या होत्या, “मी डिंपलच्या हुंड्याचाच एक भाग होते.” डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या वैवाहिक आयुष्यात सुरुवातीपासूनच अनेक अडचणी होत्या. मात्र, एकाच घरात राहूनही त्या नात्यातील गंभीर समस्या आपल्याला तेव्हा जाणवल्या नव्हत्या, असं सिंपल यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं. त्या म्हणालेल्या, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी त्यांच्याबरोबर त्याच घरात राहत होते, तरीही डिंपल आणि काका (राजेश खन्ना) यांच्यातील समस्या किती गंभीर होत्या, याची मला कल्पनाच नव्हती. खरं सांगायचं तर, माझं आणि त्यांचं (राजेश खन्ना यांचं) कधीच फारसं जमलं नाही.”

“राजेश खन्ना मला कचऱ्यासारखी वागणूक देत होते”

राजेश खन्ना यांच्याबद्दल बोलताना सिंपल कपाडिया म्हणालेल्या, “ते व्यक्ती म्हणून खूपच वेगळे होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेणं कठीण होतं. त्यांच्याशी मी कधीच जुळवून घेऊ शकले नाही.” त्यांनी पुढे सांगितलं की, “शक्ती सामंत यांच्या अनुरोध या पहिल्या चित्रपटासाठी करार केल्यानंतर राजेश खन्ना यांनी मला कचऱ्यासारखी वागणूक दिली होती”. सिंपल पुढे म्हणाल्या, “तो माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे मी खूप घाबरले होते आणि स्वतःबद्दलही साशंक होते. अशावेळी त्यांनी मला कोणतीही मदत केली नाही. संवादांच्या तालमी करायलाही त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते अजिबात सहकार्य करत नव्हते. एक दिवस तर माझ्या डोळ्यांत अश्रू आले होते.” ही परिस्थिती पाहिल्यानंतर दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी हस्तक्षेप केला. यापूर्वी त्यांनी ‘आराधना’, ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये राजेश खन्नांबरोबर काम केलं होतं. मात्र, सेटवर नवोदित अभिनेत्रीला मिळत असलेली वागणूक त्यांना मान्य नव्हती. सिंपल यांनी सांगितलेलं, “अखेर शक्तीदांनी काकांना (राजेश खन्ना) चांगलंच सुनावलं. ते म्हणाले, तुम्ही सुपरस्टार असाल आणि ती तुमची मेहुणी असेल, पण माझ्या सेटवर ती एक नवोदित अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्याशी आदराने वागलं पाहिजे. त्यानंतर काकांकडे त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.”

“मी कधीच दुसरी डिंपल होऊ शकत नाही”

‘अनुरोध’ चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर १९७७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सिंपल कपाडिया यांनी राजेश खन्नांबरोबर काम करण्याचा अनुभवही शेअर केला होता. त्या म्हणालेल्या, “खरं सांगायचं तर, त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप अस्वस्थ वाटायचं. एखाद्या व्यक्तीला जवळून ओळखत असताना कॅमेऱ्यासमोर त्याचं वेगळंच रूप पाहणं मला विचित्र वाटायचं.” डिंपल कपाडिया यांची बहीण असल्यामुळे सिंपल यांची सतत बहिणीशी तुलना केली जायची. त्यावर त्या म्हणालेल्या, “अनुरोध हा बॉबी नाही आणि त्याची त्या चित्रपटाशी तुलना होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे मीही कधीच दुसरी डिंपल होऊ शकत नाही.”

“कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं” – सिंपल

सिंपल यांनी सांगितलेलं की, ‘अनुरोध’ अपयशी ठरल्याचं त्यांना फारसं दुःख नव्हतं. कारण त्यांना कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. त्या म्हणालेल्या, “मी चित्रपटांमध्ये काम केलं ते केवळ पैशांची गरज असल्यामुळे. मला आई-वडिलांकडे पैसे मागायला आवडत नव्हतं. शिवाय, मी हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं नव्हतं. त्यामुळे मला दुसरी कोणती सन्मानजनक नोकरी मिळाली असती?” त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांनी कधीच अभिनयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. आवश्यक तेवढेच टेक द्यायचे, यापलीकडे अभिनयात स्वतःला झोकून देण्याची त्यांची कधीच इच्छा नव्हती. डिंपल कपाडियांची बहीण असल्यामुळे सिंपल कपाडिया यांची कायम त्यांच्याशी तुलना केली जायची. अनेकांनी त्यांना “सुंदर डिंपलची कुरूप बहीण” असंही म्हटलं होतं. याबद्दल बोलताना सिंपल म्हणालेल्या, “अनुरोध फ्लॉप झाल्यानंतर अनेकांनी असं म्हटलं की, डिंपलसारख्या सुंदर अभिनेत्रीला पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्या कुरूप बहिणीला स्वीकारलं नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं म्हणजे त्या चित्रपटात मी स्वतःही विशेष मेहनत घेतली नव्हती.” त्यांनी पुढे डिंपल यांचं कौतुक करत म्हटलं, “डिंपल सुंदर आहे, हे मला माझ्या जन्मापासूनच माहीत आहे. माझी बहीण या चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण जगातील सर्वात सुंदर व्यक्तींंपैकी एक आहे.”

डिंपल कपाडिया यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या लूकपर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत सिंपल यांचाच सल्ला घेतला जायचा. याबद्दल बोलताना सिंपल म्हणालेल्या, “मी सतत तिच्यासाठी माझे मौल्यवान सल्ले देतच होते. मग त्यासाठी मला मानधनही मिळायला हवं, असं मला वाटलं.” यानंतर त्यांनी इतर अभिनेत्रींसाठीही वेशभूषा डिझाइन करण्यास सुरुवात केली. श्रीदेवी आणि माधवी यांसारख्या अभिनेत्रींसाठीही त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम केलं.

“माझ्यासाठी बहीणच सर्वात महत्त्वाची होती” – सिंपल

डिंपल कपाडिया यांचं वैवाहिक आयुष्य जवळून पाहिल्यामुळे सिंपल यांचं त्यांच्याशी अतूट नातं निर्माण झालं होतं. १९८६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, लग्न करायचं झालं तर त्यांचा होणारा नवरा डिंपल यांच्या घराजवळ राहणारा असावा, अशी त्यांची इच्छा होती. त्या म्हणालेल्या, “बहुतेक मुली उंच, देखणा आणि आकर्षक जोडीदार शोधतात. पण माझी अट वेगळी होती. माझा होणारा नवरा माझ्या बहिणीच्या घराजवळ राहणारा असावा. त्यानेही डिंपलशी माझ्यासारखंच प्रेमाने वागावं आणि मी तिच्याबरोबर वेळ घालवण्यावर त्याची हरकत नसावी. कारण माझ्यासाठी माझी बहीणच सर्वात महत्त्वाची आहे.” यानंतर १९९२ मध्ये सिंपल यांनी राजिंदर सिंह शेट्टी यांच्याशी लग्न केलं. मात्र, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांनी नंतर घटस्फोट घेतला. १९९३ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. पुढे त्यांच्या मुलाने करणने ‘ब्लँक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

‘रुदाली’साठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

वेशभूषाकार म्हणून सिंपल कपाडिया यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा १९९४ मध्ये आला. डिंपल कपाडिया अभिनित ‘रुदाली’ चित्रपटासाठी उत्कृष्ट वेशभूषा केल्याने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. यानंतर ‘डर’, ‘बरसात’, ‘चाची ४२०’, ‘२३ मार्च १९३१ : शहीद’, ‘सोचा ना था’, ‘द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठीही त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम केलं.

“माझ्या प्रत्येक चित्रपटातील वेशभूषा सिंपलच करायची”

डिंपल कपाडिया यांच्यासाठीही सिंपल याच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आधार होत्या. २०२४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत डिंपल यांनी बहिणीच्या योगदानाची आठवण सांगितली होती. त्या म्हणालेल्या, “माझ्या प्रत्येक चित्रपटातील संपूर्ण वेशभूषेची जबाबदारी सिंपलच सांभाळायची.”

कर्करोगाशी झुंज देत वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिंपल कपाडिया यांचं २००९ मध्ये, वयाच्या ५१ व्या वर्षी, कर्करोगाशी तब्बल तीन वर्षे झुंज दिल्यानंतर निधन झालं. त्यांचं शेवटचं काम ‘तुम मिलो तो सही’ (२०१०) या चित्रपटासाठी होतं. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हा चित्रपट अर्धवट सोडावा लागला. चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर सदानंद यांनी एका मुलाखतीत सिंपल यांच्या जिद्दीचं कौतुक केलं होतं. ते म्हणालेले, “मला जगाने सिंपलला व्हीलचेअरवर पाहावं, असं वाटत नव्हतं. ती आजारी असतानाही सेटवर यायची आणि आमच्याबरोबर वेळ घालवण्याचा आग्रह धरायची. आम्ही तिच्या प्रकृतीची विचारपूस केली की, ती हसत इथे आजारी कोण आहे? असं म्हणायची. तिच्या सकारात्मक वृत्तीने आम्हा सगळ्यांना चित्रपट पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.”

बहिणीचं दुःख मनात ठेवून डिंपल यांनी पूर्ण केलं काम

कबीर सदानंद यांनी डिंपल कपाडिया यांच्या धैर्याचाही कौतुक केलेलं. ते म्हणालेले, “सिंपलच्या आजारपणाचं आणि तिच्या निधनाचं दुःख डिंपलने कधीही सेटवर दिसू दिलं नाही. तिच्या वेदनेची कल्पनाही आम्हाला येऊ दिली नाही. ती दररोज रुग्णालयात जाऊनही वेळेवर शूटिंगला यायची आणि कॅमेऱ्यासमोर उभी राहायची. स्वतःच्या दुःखाचा गाजावाजा करणं हा तिचा स्वभाव नव्हता. बहिणीच्या आजाराचं संपूर्ण दुःख तिने मनातच ठेवलं.” ‘अनुरोध’ व्यतिरिक्त सिंपल कपाडिया यांनी ‘चक्रव्यूह’, ‘मन पसंद’, ‘लूटमार’, ‘जमाने को दिखाना है’, ‘प्यार के दो पल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं.