Simran on Bollywood : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ही अस्सल कलाकार आणि मातीशी नाळ जोडणारे कथानक यासाठी ओळखली जाते. सध्या संपूर्ण देशातील प्रेक्षकांना दाक्षिणात्य चित्रपटांनी भुरळ घातली आहे. सध्या हे वातावरण निर्माण झाले असले तरी पूर्वी बॉलीवूडचा दबदबा कायम होता. बॉलीवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांना हीन वागणूक दिली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असूनही हिंदी चित्रपटांच्या सेटवर आपल्याला बाजूला सारले जाते असल्याच्या भावना कलाकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत. अभिनेता दुलकर सलमानने काही महिन्यांपूर्वी असे अनुभव आल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता अभिनेत्री सिमरन हिनेदेखील बॉलीवूडकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे उघड केले आहे.
अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सिमरन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तेरे मेरे सपने, मुकद्दर, दादागिरी व बाल ब्रह्मचारी असे हिट चित्रपट देणाऱ्या सिमरनने बॉलीवूडमध्ये काम करणे का सोडले याचे कारण उघड केले आहे. यावेळी तिने बॉलीवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांना मिळणारी वागणूक आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अत्यल्प सुविधा यावर परखड भाष्य केले.
‘फिल्मफेअर’शी संवाद साधताना अभिनेत्री सिमरन हिने दोन्ही चित्रपटसृष्टीतील कामाची पद्धत आणि मिळणारी वागणूक याबाबत खुलासा केला. तिने हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स अनेकदा नाकारण्यामागील प्रमुख कारण सांगितले. अभिनेत्री सिरमन म्हणाली की, बॉलीवूडमधील कामाच्या संस्कृतीशी (working culture) जुळवून घेणे मला कठीण जाते. तमीळ चित्रपटसृष्टीत अत्यंत यशस्वी कारकीर्द गाजवणाऱ्या आणि नुकत्याच ‘गुलमोहर’ चित्रपटात काम केलेल्या सिमरनने, दक्षिण भारतीय कलाकारांच्या कर्तृत्व आणि त्यांच्या वारशाकडे बॉलीवूडमध्ये अनेकदा दुर्लक्ष केले जाते, अशी खंत व्यक्त केली.
बॉलीवूडमध्ये कोणताही आदर दिसून येत नाही – सिमरन
पुढे ती म्हणाली की, माझा बॉलीवूडमधील लोकांशी संवाद जुळत नाही. असे वाटते की, आम्ही दक्षिणेकडे जे काम केले आहे, ते त्यांनी पाहिलेलेच नाही. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच काही अभिनेते आपल्यासोबत एक वारसा हक्क घेऊन येतात आणि त्या गोष्टीचा मला त्रास होतो. तिथे कोणताही आदर दिसून येत नाही. मी माझे अर्ध्याहून अधिक आयुष्य चित्रपटसृष्टीला समर्पित केले आहे. असे असूनही जर मला योग्य तो आदर मिळत नसेल किंवा तो दिला जात नसेल, तर ही बाब मनाला खूप लागते. त्यामुळे मग काहीच अर्थ उरत नाही, अशा शब्दांत अभिनेत्री सिमरन हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
निर्मात्यांच्या दाक्षिणात्य कलाकारांना अटी
त्याचबरोबर निर्मात्यांनी केलेला अपमानदेखील अभिनेत्री सिमरन हिने सांगितला. “काही निर्मिती संस्था या अगदी मूलभूत सुविधादेखील पुरवत नाहीत आणि त्यावरून वाद घालतात. माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांवर ते मर्यादा घालतात. ‘तुम्ही इतके कर्मचारी सोबत आणू शकत नाही,’ अशा प्रकारची विधाने करतात. तसेच हॉटेल्स आणि तिकिटांच्या बाबतीतही तडजोड करण्यास सांगतात आणि या गोष्टी मला खूप खटकतात पण याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नसते. तिथे एक प्रकारचा श्रेणीक्रम ठरवलेला असतो. त्यामुळे तुम्हाला काम करण्याची इच्छाच राहत नाही. हीन वागणूक दिल्याने उत्साह वाटत नाही. तुम्हाला मनस्ताप होतो,” अशी बॉलीवूडची परिस्थिती अभिनेत्री सिमरन हिने मांडली.
सर्वत्र एकसारखी परिस्थिती नाही
निर्मात्यांच्या अशा वागणुकीमुळे कलाकारांमध्ये स्वतःला कमी लेखले जात असल्याची भावना निर्माण होते. मात्र, सगळीकडे अशी परिस्थिती नसते, असेही सिमरनने स्पष्ट केले. काही चित्रपट निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेसनी अत्यंत आपुलकीने आणि व्यावसायिक पद्धतीने वागणूक दिल्याचे तिने सांगितले. तसेच, सनी देओलसोबतच्या आगामी गबरू या चित्रपटात काम करतानाचा अनुभव शेअर करताना तिने सकारात्मक वातावरण निर्माण केल्याबद्दल निर्माते ओम चंगानी यांचे विशेष कौतुक केले.
