Singam Fame Murali Sharma : मनोरजंन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या वाट्याला मुख्य भूमिका जरी फार आल्या नसल्या तरी त्यांनी त्यांना ऑफर झालेली प्रत्येक भूमिका खुबीने साकारली आहे आणि त्यांच्या अभिनय शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या भूमिकांमुळेच लोक त्यांना ओळखतात. असंच काहीसं घडलं अभिनेते मुरली शर्मा यांच्याबरोबर.

मुरली शर्मा हिंदी व दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्यांची छाप सोडली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. मुरली यांनी नुकतीच सहपत्नीक ‘कर्ली टेल्स’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या सघर्षकाळाची माहिती दिली आहे.

मुरली शर्मा यांनी सांगितला संघर्षकाळ

मुलाखतीत मुरली यांना आम्ही तुम्हाला अनेक चित्रपटांमध्ये पोलिसाच्या भूमिकेत पाहिलं आहे. तुमचं लहानपणी पोलिस होण्याचं स्वप्न वगैरे होतं का, असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “नाही. पण मला पोलिस व्हायला आवडलं असतं. माझ्या आईला मी डॉक्टर व्हावं, असं वाटत होतं. मी अभ्यासात फारच वाईट होतो. त्यामुळे तेव्हा मला अभिनय खूप सोपा आहे, असं वाटायचं. मी मुंबईतच जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो आहे. माझे वडील तर मला तुझ्या चेहऱ्यामुळे तुला कोणीच काम देणार नाही, असं म्हणायचे. पण ते नेहमी जे ठरवलंय ते करत राहा. काळजी करू नको. तू योग्य मार्गावर आहेस याची फक्त तुला जाणीव पाहिजे. असं म्हणायचे”

Award Banner

मुरली शर्मा याबद्दल पुढे म्हणाले, “त्यामुळे माझ्या वडिलांनी मला कधीच याबद्दल विचारलं नाही. सुरुवातीची १२-१५ वर्षं खूप कठीण गेली. सुरुवातीला खूप अपयश मिळालं. त्यानंतर कुठे जाऊन मला ‘मै हूँ ना’ चित्रपट मिळाला. ९० च्या दशकात मी अभिनेता म्हणून प्रवास सुरू केलेला.” मुरली यांनी पुढे अशी कोणती भूमिका आहे, जी केल्यानंतर तुम्हाला समाधान मिळालं, असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “मला असं वाटतं मकबूल आणि ‘मै हूँ ना’नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या.”

मुरली शर्मा पुढे म्हणाले, “मी रोहित शेट्टीला एकदा मेसेज केलेला की, माझ्याकडे काम नाहीये. तेव्हा त्यानं मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या ऑफिसात बोलावलं आणि सिंघम’ ची कथा ऐकवली. ‘सिंघम’मधील ती भूमिका खूप लोकप्रिय झाली. लोक मला सिंघम म्हणायचे. मी म्हणायचो की, मी नाही; अजय देवगण सिंघम आहे; पण तो चित्रपट खूप लोकप्रिय ठरला.”