Shah Rukh Khan Singer Abhijeet Bhattacharya Ego Clash: बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान आणि त्याचा पडद्यामागचा आवाज मानले जाणारे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निधी वासनदानीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी शाहरुखच्या अहंकारावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “शाहरुखचा अहंकार आणि माझा स्वाभिमान हेच आमच्यातील दुराव्याचे मुख्य कारण आहे. आमिर खानने आपल्या कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवले होते, तरीही तो त्याला भेटला, मग माझ्याशी बोलायला त्याला काय अडचण होती?”

निधी वासनदानीशी बोलताना अभिजीत म्हणाले, “शाहरुख खानचा अहंकार आणि माझा स्वाभिमान हे आमच्यातील दुराव्याचं मुख्य कारण आहे. शाहरुख माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. जेव्हा फराह खानच्या पतीने त्याला इतक्या शिव्या दिल्या होत्या, तेव्हाही शाहरुखने त्याला मिठी मारली. अगदी आमिर खानने तर आपल्या कुत्र्याचं नाव शाहरुख ठेवलं होतं, तरीही ते दोघे पुन्हा मित्र झाले.”

शाहरुख खानने एकदाही माफी मागितली नाही

“मला या गोष्टीचे वाईट वाटलं की तो एकदाही सॉरी म्हणू शकला नाही. तू एवढा मोठा माणूस असूनही साधी माफी नाही? तू जी चूक केली आहे, ती लक्षात ठेव; हीच गोष्ट तुमच्यासोबतही घडू शकते, कदाचित तुझ्या स्वतःच्या होम प्रॉडक्शनमध्येच,” असं अभिजीत भट्टाचार्य म्हणाले.

हा अहंकार नाही, तर…

आपला निर्णय अहंकारापोटी नसल्याचं स्पष्ट करत अभिजीत म्हणाले, “मला त्या गोष्टीचा अभिमान होता की मी इतरांसाठी गाणं गात नव्हतो. मला वाटायचं की मी शाहरुखचाच आवाज आहे आणि मी दुसऱ्या कोणासाठीही गाणार नाही. हा अहंकार नाही, तर मनाला झालेली खोल जखम आहे.”

अभिजीत भट्टाचार्य यांनी असे काही प्रसंग सांगितले जेव्हा समोर असतानाही किंग खानने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. “जेव्हा मी त्याला सगळ्यांना मिठी मारताना पाहायचो, तेव्हा मी तिथेच समोर बसलेला असायचो. तो सहज म्हणू शकला असता की, ‘चल अभिजीत, जे झालं ते विसरून जाऊया.’ किमान एवढं तरी तो करू शकला असता.”

प्रसिद्धीसाठी शाहरुख खानच्या नावाचा वापर केला जातो, या आरोपांवर बोलताना अभिजीत म्हणाले, “असं नाहीये की मला तुझ्यासाठी गाण्याची खूप इच्छा आहे. तू म्हणतोस की लोक प्रसिद्धीसाठी तुझ्या नावाचा वापर करतात, पण मी तुझ्या नावाचा वापर का करू? उलट तू माझ्या आवाजाचा वापर करतोय. हेच तर दुःख आहे.”

मी त्याची कॉलर धरली असती अन्…

आपण शाहरुखच्या जागी असतो, तर ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली असती, असं अभिजीत यांनी सांगितलं. “जर माझ्याकडून अशी चूक झाली असती आणि मी शाहरुखच्या जागी असतो, तर मी थेट त्याच्या घरी गेलो असतो, त्याची कॉलर धरली असती आणि म्हणालो असतो, ‘चल आता, जे झालं ते विसरून जा.'”

अभिजीत पुढे म्हणाले, “त्याचं वागणं अत्यंत कोत्या मनाचं आहे. माझी गाणी आयुष्यभर ऐकली जातील. आज राजेश खन्ना इतके मोठे सुपरस्टार असूनही लोकांना ते कोण होते हे कदाचित माहित नसेल, पण ते किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांची गाणी आवडीने ऐकतात. ती गाणी राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झाली होती हे आजच्या पिढीला माहित नसेल. आपल्याला माहित असेल, पण पुढच्या पिढीला ते माहित नसणार.”

मनात कटुता असली तरी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. “जर आमच्यात पुन्हा मैत्री झाली, तर शाहरुखला ज्या प्रकारच्या आवाजाची गरज आहे, तसा आवाज मी देऊ शकतो,” असं अभिजीत भट्टाचार्य म्हणाले.

अभिजीत आणि शाहरुख खान यांच्यातील दुरावा

९० चे दशक आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानची सर्वाधिक गाणी गायली. तौबा, वो लडकी सबसे अलग है, बादशाह ओ बादशाह आणि तुम्हे जो मैने देखा यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांचा या यादीत समावेश आहे. मात्र, २००९ मधील ‘बिल्लू’ चित्रपटानंतर त्यांचं नातं संपलं. कामाचे योग्य श्रेय आणि ओळख न मिळाल्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला, असं अभिजीत सांगतात. खासकरून ‘मैं हूं ना’ चित्रपटानंतर त्यांना जाणवलं की सेटवरील प्रत्येकाची दखल घेतली गेली, परंतु गायकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. या अनुभवामुळे आपल्या स्वाभिमानाला धक्का लागला असं अभिजीत भट्टाचार्य म्हणतात.