Singer Kanika Kapoor announces divorce with second husband: ‘जुगनी जी’, ‘लव्हली’, ‘कमली’, आणि ‘बेबी डॉल’ या हिट गाण्यांनी घराघरांत पोहोचलेली ४८ वर्षांची बॉलिवूड गायिका कनिका कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ३ मुलांची आई असलेल्या कनिकाने २० मे २०२२ रोजी लंडनमध्ये एनआरआय उद्योगपती गौतम हाथीरामानी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. लग्नाआधी १५ वर्षांची मैत्री असलेल्या या दांपत्याचा संसार अवघ्या ४ वर्षांत संपुष्टात आला आहे. कनिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पती गौतमपासून विभक्त होत असल्याची अधिकृत माहिती दिली.

कनिका कपूरने घटस्फोटाची घोषणा केली

कनिकाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “खूप विचार केल्यानंतर मी आणि माझ्या पतीने विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र जो वेळ घालवला, त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ असेन. मी त्याला भविष्यासाठी सदिच्छा देते. आम्ही आपापल्या आयुष्यात पुढे जातोय, त्यामुळे आमच्या प्रायव्हसीचा आदर करा.”

kanika-kapoor-divorce-gautam-hathiramani-instagram-post-marathi-news
कनिका कपूरची पोस्ट (फोटो- इन्स्टाग्राम)

दरम्यान, कनिका कपूर व गौतम हाथीरामानी यांची लग्नापूर्वी १५ वर्षांची मैत्री होती. गौतम हे लंडन येथील नावाजलेले एनआरआय उद्योगपती आहेत. कनिकाचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला, त्यानंतर तिने गौतम यांना २०१४ साली लग्नासाठी विचारलं होतं. गौतम यांना वाटलं की कनिका गंमत करतेय. पण कनिकाने २०२० मध्ये पुन्हा एकदा त्यांना लग्नाची मागणी घातली. गौतम यांनी होकार दिला, पण कनिकाच्या मनात भीती होती की गौतमचे कुटुंबीय तिला स्वीकारणार नाहीत. कारण ती घटस्फोटित होती व ३ मुलांची आई होती. पण गौतम यांच्या कुटुंबाने कनिकाच्या मुलांनाही स्वीकारलं. त्यानंतर, २० मे २०२२ रोजी त्यांनी लंडनमध्ये थाटामाटात लग्न केलं. पण आता अवघ्या चार वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.

कनिका कपूरचं पहिलं लग्न व घटस्फोट

कनिका कपूर अवघ्या १८ वर्षांची असताना १९९७ साली तिचं पहिलं लग्न एनआरआय उद्योगपती राज चंडोक यांच्याशी झालं होतं. लग्नानंतर ती लंडनला स्थायिक झाली. या लग्नापासून तिला तीन अपत्ये आहेत. आयना व समारा या दोन मुली आणि एक मुलगा युवराज. वैवाहिक आयुष्यातील मतभेद आणि तणावामुळे २०१२ मध्ये कनिका कपूर व राज यांचा घटस्फोट झाला.