Singer Kunal Ganjawalla surname history and British rule connection : ‘भीगे होंठ तेरे’ आणि ‘सलाम नमस्ते’ सारख्या सुपरहिट गाण्यांनी संपूर्ण देशाला वेड लावणारा लोकप्रिय गायक कुणाल गांजावाला सध्या त्याच्या एका रंजक खुलाशामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. आपल्या ‘गांजावाला’ या आडनावावरून नेहमीच लोकांकडून विनोद केले जातात, पण या आडनावाला एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे, असा खुलासा कुणालने एका मुलाखतीत केला आहे. तसेच ब्रिटीशांनी त्याच्या पूर्वजांना ‘रावसाहेब’ ही पदवी देऊन करात सूटही दिली होती, असं त्याने सांगितलं.
कुणाल गांजावालने सांगितलं की, तो बलोची हिंदू आहे. त्याचे पूर्वज ब्रिटिश राजवटीच्या काळात वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी गांजाची शेती करायचे. दुबईतील रेडिओ जॉकी परिक्षित बलोचीशी बोलताना कुणालने हा खुलासा केला.
उपचारासाठी गांजा पिकवायचे कुणाल गांजावालाचे कुटुंबीय
“ब्रिटिश काळात माझे पूर्वज औषधांची गरज भागवण्यासाठी गांजाची शेती करायचे. १९४२ च्या ‘भारत छोडो आंदोलना’आधी त्याचे कुटुंबीय हा व्यवसाय करायचे. आम्ही गांजा पिकवायचो आणि तो सरकारला द्यायचो. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की आम्हाला करातून सूट मिळायची… कारण ब्रिटिश आमच्याकडून तो गांजा खरेदी करायचे. त्यांनी आम्हाला ‘रावसाहेब’ ही पदवी दिली होती. आम्ही उपचारांसाठी गांजा पिकवायचो. त्या गांजापासून कर्करोगाच्या रुग्णांसाठी इंजेक्शन्स बनवले जायचे,” अशी माहिती कुणाल गांजावालाने दिली.
कुणालच्या पूर्वजांचा व्यवसाय केव्हा बंद झाला?
आपले पूर्वज कायद्याच्या विरोधात जाऊन काम करत नव्हते. गांजा पिकवण्याचा व्यवसाय अधिकृत होता आणि तो ब्रिटीश सरकारच्या अंतर्गत यायचा. त्या काळात कुणालचे कुटुंबीय परवानाधारक फार्मासिस्ट म्हणून ओळखले जायचे. ‘भारत छोडो आंदोलना’च्या दरम्यान हा व्यवसाय बंद झाला, असं कुणाल गांजावालाने स्पष्ट केलं.
कुणाल गांजावालाच्या आडनावाचा असा इतिहास आहे, पण तरीही त्याच्या आडनावावरून अनेक विनोद होत असतात. “कधीकधी लोकांना माझ्या आडनावाबद्दल उत्सुकता असायची, तर कधी ते माझी खिल्ली उडवायचे. पण हाच खरा इतिहास आहे. लोक म्हणायचे, ‘अरे गांजावाला, तुझ्याकडे माल आहे का?’ आणि मी सांगायचो की मी धूम्रपान करत नाही किंवा अशा पदार्थांचे सेवन करत नाही,” असं कुणाल गांजावाला म्हणाला.
