आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. या चित्रपटात रणवीर सिंहसह सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त व अर्जुन रामपाल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या कथेपासून ते गाण्यांपर्यंत… सर्वच गोष्टी चाहत्यांच्या पसंतीस पडल्या. Fa9la, कारवानसह चित्रपटातील ‘शरारत’ गाण्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
‘धुरंधर’ची सगळी गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण ‘शरारत’ गाण्याची क्रेझ काही वेगळीच आहे. या गाण्यामध्ये आयशा खान व क्रिस्टल डिसूझाने हटके परफॉर्ममन्स केला आहे; तर जास्मिन सँडलास व मधुबंती बागची या गायिकांनी हे गाणं गायलंय. म्युझिक व्हिडीओमध्ये आयशा आणि क्रिस्टल यांच्यासह गाण्याच्या गायिकासुद्धा या गाण्यात दिसल्या आहेत.
मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, मधुबंती सुरुवातीला या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसण्यासाठी थोडी संकोचत होती? पण दिग्दर्शक आदित्य धरला तिच्याविषयी आत्मविश्वास होता. आदित्य धरमुळेच तिनं या गाण्यासाठी होकार दिला. तसेच आदित्यला तिनं एक अटही घातली होती. त्याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. गायिका नेमकं काय म्हणालीय? चला जाणून घेऊ..
Fever HM या यूट्यूब चॅनलशी साधलेल्या संवादात मधुबंतीनं सांगितलं, “सुरुवातीला मला या व्हिडीओमध्ये दिसण्याबद्दल संकोच वाटत होता. स्टुडिओमध्ये जाऊन गाणं रेकॉर्ड करणं किंवा घरी राहणं याशिवाय बाकी सगळ्याच गोष्टींबाबत मला नेहमीच थोडा संकोच वाटतो. त्यामुळे मी आदित्य धर यांना विचारलं, त्या सीनमध्ये आधीच इतके कलाकार, डान्सर्स आणि लोक आहेत. मग आम्ही (जास्मिन सँडलास व मधुबंती बागची) का हव्या आहोत?’”
‘शरारत’ गाण्यासाठी ठेवलेली ‘ही’ अट
ती पुढे म्हणाली, “पण आदित्यला हे गाणं नेमकं कसं करायचं आहे, याची पूर्ण खात्री होती. त्याच्या डोक्यात या गाण्याचं एक व्हिजन होतं. त्याला ते गाणं तसंच हवं होतं आणि तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी वेगळं काही कारणदेखील नव्हतं. तो म्हणाला, ‘मला हेच हवं आहे,’ आणि मग मी ‘ठीक आहे’, असं म्हटलं.” पुढे तिनं हसत सांगितलं, “माझी फक्त एकच अट होती. मी आदित्य यांना सांगितलं की, मला नाचायला लावू नका. कारण- लोकांनी मला नाचताना पाहू नये, असं मला वाटत होतं.”
‘धुरंधर २’ १९ मार्चला होणार रिलीज
दरम्यान, ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रचंड हिट ठरला. या चित्रपटानं जगभरात सुमारे १३०० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता या महिन्यात १९ मार्च रोजी ‘धुरंधर २’ रिलीज होणार आहे. नुकताच ७ मार्चला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
