Singer Shreyas Puranic Blessed With Baby Girl : ‘इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली मराठी गायिका सायली कांबळेने नुकताच बाळाला जन्म दिला. तीन महिन्यांनी तिने बाळाचे बारसेही केले. बाळाचे नाव तिने ‘वेद’ असे ठेवले आहे. त्यानंतर आता आणखी एका गायक व संगीतकाराने बाळ झाल्याची खुशखबर शेअर केली आहे.
रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातील सतरंगा या लोकप्रिय गाण्यामुळे घराघरात पोहोचलेला गायक व संगीतकार श्रेयस पुराणिकला मुलगी झाली आहे. आपल्या सोशल मीडियाद्वारे त्याने मुलगी झाल्याची खुशखबर चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणारा श्रेयस सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. श्रेयस स्वत:चे फोटो-व्हिडीओसुद्धा शेअर करताना दिसतो. अशातच त्याने नुकतीच मुलगी झाल्याची खुशखबर शेअर केली आहे.
बॉलीवूड गायक श्रेयस पुराणिक झाला बाबा
२३ मार्च २०२६ रोजी श्रेयस आणि त्याची पत्नी ऐश्वर्या या दोघांनी एका गोंडस मुलीचे स्वागत केले. मुलगी झाल्याची खुशखबर सांगत श्रेयस आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली. एका शांत झोपलेल्या चिमुकल्या मुलीचा फोटो असलेली पोस्ट शेअर करीत त्यांनी आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. “मुलगी झाली आहे! जय माता दी. गणपती बाप्पा मोरया. आम्हाला किती आनंद झाला आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे”, अशा शब्दांत दोघांनी मुलगी झाल्याची खुशखबर शेअर केली आहे.
सेलिब्रिटी मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव
या पोस्टमध्ये श्रेयस-ऐश्वर्या यांनी आपल्या लाडक्या लेकीची ओळख ‘बेबी पुराणिक’ म्हणून करून दिली आहे. मुलगी झाल्याची पोस्ट शेअर करताच मनोरंजन आणि संगीत विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेसुद्धा “लक्ष्मी आली” अशी कमेंट केली आहे. त्याशिवाय साचेत परंपरा, अमाल मलिक, भारती सिंग, गायक राहुल वैद्यसह अनेक सेलिब्रिटी मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.
श्रेयस आणि ऐश्वर्या यांच्याबद्दल थोडक्यात
श्रेयस-ऐश्वर्या यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, दोघांची पहिली भेट ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या संगीत विद्यालयात झाली होती. तेथे एकत्र शिकत असताना त्यांची मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. २०२० मध्ये कोरोनामध्ये त्यांनी पुण्यात मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यानंतर आता सहा वर्षांनी श्रेयस-ऐश्वर्या दोघेही एका मुलीचे आई-वडील झाले आहेत.
श्रेयस पुराणिकच्या कामाबद्दल थोडक्यात
दरम्यान, श्रेयसबद्दल सांगायचे झाल्यास त्याने आपल्या करिअरची सुरुवात गायक म्हणून केली. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी या चित्रपटातील ‘गजानना’ आणि ‘अब तोहे जाने ना दूँगी’ ही गाणी श्रेयसने गायली आहेत. तसेच भन्साळींच्याच ‘पद्मावत’साठी त्याने सहायक संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. ‘ॲनिमल’मधील ‘सतरंगा’ गाण्यामुळे त्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
