Sonu Nigam health updates : आपल्या सुमधुर आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय गायक सोनू निगम सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे देश-विदेशांत लाईव्ह कॉन्सर्ट होत असतात. या लाईव्ह कॉन्सर्टला तरुण वर्गाची मोठी गर्दी होत असते. आपल्या खास शैलीतील गायनाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सोनू निगम यांनी नुकतीच एक आरोग्यविषयक माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. सोनू हे काही दिवसांपासून तीव्र वेदनांचा सामना करीत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोनू यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत आरोग्याबाबत माहिती दिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सोनू नियम यांना झाली आहे आरोग्यविषयी समस्या
लोकप्रिय गायक सोनू निगम हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांचे कार्यक्रम, तसेच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करीत असतात. मात्र, यावेळी त्यांनी आरोग्याविषयीची माहिती दिली आहे. काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसून, त्यांना ‘पिंच्ड नर्व्ह’ची समस्या निर्माण झाली असल्याची माहिती सोनू निगम यांनी दिली आहे.
पेनकिलर घ्यावे लागत आहेत – सोनू
ते म्हणाले की, काही दिवसांपासून ‘पिंच्ड नर्व’ची समस्या निर्माण झाली आहे. एक आठवड्यापासून याचा त्रास सहन करीत आहे. त्यासाठी एमआरआय आणि सीटी स्कॅनसुद्धा झाले आहे. त्यामुळे खूप औषधोपचारासह फिजिओ थेरपीसुद्धा सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांपासून मला खूप त्रास झाला आहे, वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर घ्यावे लागत आहेत, अशी माहिती सोनू निगम यांनी दिली आहे.
गोळ्यांचा परिणाम माझ्या आवाजावर होत आहे – सोनू निगम
पुढे ते म्हणाले. “सध्या मी पेनकिलर घेत असल्यामुळे त्याचा माझ्या गळ्यावरही परिणाम झाला आहे. गळा जड वाटत आहे आणि आवाजही पूर्वीसारखा वाटत नाही. आज मला एक कार्यक्रम करायचा आहे. जवळपास २० दिवसांनंतर, कदाचित महिनाभराच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा स्टेजवर जाणार असल्याने थोडा आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटत आहे. त्यात गळाही साथ देत नाहीये; पण आता दुसरा पर्याय नाही. तब्येत ठीक नसल्यामुळे अनेक औषधे आणि गोळ्या घ्याव्या लागल्या, त्याचा परिणाम माझ्या आवाजावर होत असल्याचे जाणवत आहे. अशा परिस्थितीत गाण्यासाठी देवानेच मला बळ द्यावे, अशा भावना सोनू निगम यांनी व्यक्त केल्या आहेत.
आजारपण असूनही व्यावसायिक कामे सुरुच
गायक सोनू निगम यांच्या आरोग्यासंबंधित अपडेट समोर आली असली तरी ते व्यावसायिक कामामध्ये मागे राहिलेले नाहीत. त्यांनी घेतलेले सर्व कार्यक्रम पूर्ण केले आहेत. तब्येत ठीक नसतानाही सोनू यांनी मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी व गायकांनी सोनू निगम यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
