Sonu Nigam on A R Rahman : संगीतकार ए. आर. रहमान यांनी अलीकडेच हिंदी चित्रपटसृष्टीतील काही सांप्रदायिक वातावरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत. इंडस्ट्रीत ज्याप्रकारचा बदल झाला आहे, त्यामुळे त्यांना पूर्वीसारखं काम मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर अनेकांनी त्यांची मतं व्यक्त केली होती. यादरम्यान गायक सोनू निगमचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्यांनी रहमान यांच्याबद्दल मत व्यक्त केलं होतं.
O2 इंडियाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत सोनू निगम म्हणाला होता, “रहमानची कुणाशी फार मैत्री नाही. ते कोणाशीही खूप मोकळेपणाने बोलत नाहीत. ते सहजपणे कुणासमोर मन मोकळं करत नाहीत. कदाचित त्यांचे जुने मित्र, जे त्यांना ‘दिलीप’ म्हणून ओळखतात, त्यांच्याबरोबर ते बोलत असतील; पण मी तरी त्यांना कोणाशीही मोकळेपणाने बोलताना पहिलं नाही. ते फक्त त्यांच्या कामात रमतात.”
ए. आर. रहमान यांना इतरांच्या गोष्टीत रस नाही: सोनू निगम
सोनूने सांगितलेलं की, अमेरिकेच्या दौऱ्यावर ते दोघे एकत्र असताना त्यांच्यात फक्त औपचारिक बोलणं व्हायचं. जसं की ‘हाय, ‘हॅलो ’ किंवा ‘कसे आहात?’ इतकंच. ते पुढे म्हणाले, “त्यांना गप्पा मारण्यात किंवा इतरांच्या गोष्टी जाणून घेण्यात रस नाही, तो त्यांचा स्वभावच आहे. त्यांना माझ्याबद्दल किंवा इतरांबद्दल जाणून घ्यायचं नसतं, तसेच इतरांनासुद्धा स्वतःबद्दल जास्त काही सांगायचं नसतं. ते एक वेगळेच व्यक्तिमत्त्व आहेत.”
ए. आर. रहमान यांचा स्वभाव काही वाईट नाही : सोनू निगम
अनेकांना रहमान अलिप्त राहतात असं वाटत असलं तरी सोनू निगमने स्पष्ट केलं की, “त्यांचा स्वभाव काही वाईट नाही, ते फक्त आपल्या कामात गुंतलेले असतात. ते कोणाशी वाईट वागत नाहीत, कुणाचं मन दुखावत नाहीत किंवा कुणाबद्दल वाईट बोलतही नाहीत. ते या सगळ्यापासून अलिप्त राहणंच पसंत करतात. अर्थात, कुटुंबातील व्यक्तींशी ते नक्कीच बोलत असतील, पण मी त्यांना इतरांशी फार मैत्री करताना पाहिलेलं नाही”, असं सोनूने म्हटलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी इंडस्ट्रीत पूर्वग्रह असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “गेल्या आठ वर्षांत सत्ताबद्दल झाला आहे. सध्या क्रिएटिव्ह नसलेले लोक निर्णय घेत आहेत. कदाचित यात साम्प्रदायिक बाजूही असू शकते. मात्र, हे थेट माझ्यासमोर घडत नाही. मला इतरांकडून कळतं की तुम्हाला कामासाठी निवडलं होतं, पण संगीत कंपनीने पाच इतर संगीतकारांना घेतलं. मी त्यावर म्हणतो ठीक आहे, त्यामुळे मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला मिळतो. मी कामाच्या शोधात फिरत नाही, मला काम स्वतःहून यावं असं वाटतं. माझ्या प्रामाणिकपणामुळे मला जे मिळायला हवं, ते मला मिळतंच,” असं रहमान यांनी स्पष्ट केलं होतं.

