Sonu Nigam Viral Video : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम २००४ साली कराचीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची घटना अजूनही विसरू शकलेला नाही. त्या भयानक स्फोटातून तो थोडक्यात बचावला होता. त्या दिवसाच्या आठवणी आजही त्याच्या मनात आहेत. १० एप्रिल २००४ रोजी हा स्फोट झाला होता. अशातच सोनू निगमने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने त्याला कशा प्रकारे वाचवले ते दाखवले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी सोनूची कॉन्सर्ट होणार होती, त्या ठिकाणीच काही तास आधी हा स्फोट झाला होता.
एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये सोनू निगमच्या पाकिस्तान दौऱ्याची माहिती देण्यात आली आहे. हाच व्हिडीओ सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रि-शेअर केला. त्यात दाखवले आहे की, कॉन्सर्ट सुरू होण्याच्या काही तास आधीच कार्यक्रमाच्या ठिकाणीच मोठा स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला. तरी कडक सुरक्षा व्यवस्थेत सोनू निगमने सादरीकरण केले होते.
या व्हिडीओमध्ये कॉन्सर्टचे आयोजक फुरकान टी. सिद्दीकी यांची मुलाखतही दाखवण्यात आली आहे. त्यांनी त्या दिवसाची परिस्थिती स्पष्ट करताना म्हटले आहे की, स्फोटानंतर वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते. सुरक्षा खूप वाढवण्यात आली होती आणि पाकिस्तानी रेंजर्सच्या मदतीने सोनू निगमला सुरक्षितपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचवण्यात आले. इतक्या गंभीर परिस्थितीतही सोनू निगमने परफॉर्मन्स केला होता.
त्या व्हिडीओमध्ये फुरकान सिद्दीकी यांनी स्फोटाच्या क्षणाचे वर्णन करताना सांगितले, “स्फोट झाला तेव्हा माझी गाडी पुढे होती. स्फोट मागच्या बाजूला झाला. लोक घाबरून इकडे-तिकडे पळू लागले. आम्ही मैदानाच्या कोपऱ्यात थांबलो आणि बस थेट मैदानात गेली. तिथे लोक खाली उतरले आणि मदतीसाठी सुरक्षा दलांना बोलावलं गेलं.”
परफॉर्मन्सपूर्वी सोनू निगमने तेथील लोकांशी संवाद साधताना म्हटलं होतं, “मी नेहमी तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. आजची संध्याकाळ खास आहे. तुम्ही घाईत नाही ना? भारत आणि पाकिस्तानमधील लोक खूप दुर्दैवी आहेत. कारण- इतक्या वर्षांपासून आपण एकमेकांचं प्रेम अनुभवू शकलो नाही. भारत असो किंवा पाकिस्तान, आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया की, हे प्रेम कायम वाढत राहो.”
त्या दुर्घटनेमुळे फुरकान आणि सोनू निगममध्ये एक खास नाते निर्माण झालं. फुरकान यांनी सांगितलं होतं, “दरवर्षी १० एप्रिलला आम्ही एकमेकांना संदेश पाठवायचो की, आपण भाऊ आहोत. कारण- आपण मृत्यूच्या दारातून एकत्र बाहेर पडलो आहोत.” याच वेळी फुरकान यांनी सोनू निगमच्या एका भावनिक वक्तव्याचाही उल्लेख केला. सोनूने एका मुलाखतीत असे म्हटले होते, “माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झाला. तो कुणीही केला असेल; पण मला वाचवणारादेखील एक पाकिस्तानीच होता.”
