Suresh Wadkar on Madhuri Dixit marriage rejection : ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित खूप ‘बारीक’ आहे असं म्हणून तिचं लग्नाचं स्थळ नाकारलं होतं,अशी अफवा मागील अनेक वर्षांपासून बॉलीवूडमध्ये पसरली आहे. आता अखेर सुरेश वाडकर यांनी स्वतः या याबद्दल मौन सोडले असून नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा केला आहे.

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या एका मुलाखतीत सुरेश वाडकर यांनी या जुन्या अफवेवर प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही तर त्यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आणि त्यांना माधुरी दीक्षितच्या कुटुंबाकडून कधीही लग्नाचं स्थळ आलं नव्हतं, असं स्पष्ट केलं.

सुरेश वाडकर म्हणाले, “अरे देवा, ती माधुरीची अफवा! माधुरी एखाद्या दिवशी माझे उरलेले केसही उपटून काढेल. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, इंडस्ट्रीतील माझी सहकारी आहे आणि मला ती खूप आवडते. हा खोडसाळपणा अर्चना पूरण सिंग हिने केला आहे. ती माझ्या बहिणीसारखी आहे, माझ्यावर खूप प्रेम करते. माहित नाही पण तिने कुठून तरी हे ऐकलं आणि ती टीव्हीवर याबद्दल बोलली. तेव्हापासून मी जिथे कुठे मुलाखतीला जातो, तिथे मला प्रत्येक वेळी हा प्रश्न विचारला जातो.”

सुरेश वाडकर या अफवेबद्दल थेट माधुरीशी बोलले का?

यावेळी सुरेश वाडकर यांना विचारण्यात आलं की, त्यांनी या अफवेबद्दल कधी माधुरी दीक्षितशी थेट चर्चा केली होती का? यावर उत्तर देताना सुरेश वाडकर यांनी नकार दिला. याबद्दल कधीच माधुरीशी याबद्दल चर्चा केली नाही, असं त्यांनी सांगितलं. मात्र, ते जेव्हा तरुणपणी ते इंडस्ट्रीतील ‘एलिजिबल बॅचलर’ होते, तेव्हा कदाचित माधुरीच्या कुटुंबाकडून विचारणा झाली असावी, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

माधुरीच्या कुटुंबाकडून चौकशी झाली असेल

सुरेश वाडकर म्हणाले, “कदाचित तेव्हा काहीतरी किस्सा घडला असेल. तिच्या वडिलांच्या बाजूने काहीतरी चौकशी करण्यात आली असेल, पण लोकांनी लिहिलंय की सुरेश वाडकर यांनी माधुरी खूप बारीक असल्याने नकार दिला. बारीक तर ती होतीच. जर तुम्ही तिचा ‘अबोध’ चित्रपट पाहिला, तर त्यात ती तशीच बारीक मुलगी दिसली आहे. पण मूळात लग्नाच्या स्थळाची गोष्ट माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही, तर मी नकार कसा देणार? आणि तोपर्यंत पद्मा माझ्या आयुष्यात आली होती. पद्मा माझी विद्यार्थिनी होती आणि नंतर ती माझी पत्नी झाली.”

माधुरी दीक्षितने डॉ. नेनेंशी केलं लग्न

माधुरी दीक्षित यांनी १७ ऑक्टोबर १९९९ रोजी कॅलिफोर्नियातील डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. त्यांचा लग्न सोहळा दक्षिण कॅलिफोर्नियातील माधुरी यांच्या मोठ्या भावाच्या घरी पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. त्यांची ओळख माधुरीच्या भावाने करून दिली होती. सहा महिने डेट केल्यावर त्यांनी लग्न केलं. त्यांना अरीन व रायन ही दोन मुलं आहेत.

माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिचा मां-बहन हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्यात तृप्ती डिमरी, धरना दुर्गा व रवी किशन हे कलाकार आहेत.