Usha Uthup Emotional Video : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी ब्रीच कँडी रुग्णलायात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान अवयव निकामी झाल्याने त्यांनी आज (१२ एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. या संदर्भात त्यांचे सुपूत्र आनंद भोसले यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली.
आशा भोसले यांच्या निधनानंतर बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर संगीतसृष्टीतल्या अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. श्रेया घोषाल, शंकर महादेवन, केतकी माटेगांवकर, आर्य आंबेकरसह महेश काळे यांच्यासारख्या अनेकांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं.
आशा भोसलेंच्या निधनाचे वृत्त कळताच ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांना अश्रु अनावर झाले. एनआयशी बोलताना त्यांनी आशा भोसलेंच्या आठवणीत भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “एका सुवर्णयुगाचा आज अंत झाला आहे. आशाजींबद्दल ‘त्या होत्या’ असं भूतकाळात बोलणंही मनाला पटत नाहीये. आमची रोज भेट किंवा बोलणं व्हायचं असं नाही, पण जेव्हा कधी मी मुंबईत असायचे आणि प्रभू कुंजवरून जायचे, तेव्हा आधी लतादीदींना फोन करायचे आणि त्यांच्या निधनानंतर आशाजींशी संपर्क करू लागले. माझ्यासाठी हे नातं नेहमीच आदराचं राहिलं आहे. त्यांच्यासारखी गायिका पुन्हा होणे शक्य नाही. त्यांची गाण्याची पद्धत आणि शब्दांचे उच्चार अप्रतिम होते. आजच्या पिढीतील तरुण गायक-गायिकांसाठी त्या एक मोठी प्रेरणा आहेत.”
पुढे त्या म्हणाल्या, “‘दम मारो दम’ या गाण्याशिवाय माझा एकही शो पूर्ण होत नाही. कालच आम्ही बंगळुरूमध्ये एक शो केला. गेल्या ४७ वर्षांतील माझी कोणतीही प्लेलिस्ट पाहिली तर त्यात आशाजींची गाणी आणि विशेषतः ‘दम मारो दम’ हे गाणं असतंच. त्यांच्यासारखं मी कधीच गाऊ शकत नाही. मी माझ्या पद्धतीने गाते, कारण आशाजींसारखं गाणं कोणालाच जमणार नाही. आज आशाजींना श्रद्धांजली वाहताना मी इतकंच म्हणेन की, त्यांनी संगीत क्षेत्रासाठी जे योगदान दिलंय त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”
VIDEO | Kolkata: Singer Usha Uthup on the demise of Asha Bhosle says, “What can I say? It’s the end of an era, an iconic era. She was such an amazingly versatile singer. It is unbelievable to speak about Asha ji in the past tense. Even though we didn’t meet or talk every day,… pic.twitter.com/4sdaBZ8jFt
— Press Trust of India (@PTI_News) April 12, 2026
आशा भोसले यांच्या निधनाबद्दल मुलगा आनंद भोसले यांनी माहिती दिली आहे. “आशा भोसले यांचे पार्थिव उद्या सकाळी ११ वाजता, कासा ग्रँड लोअर परळ, त्या जिथे राहायच्या त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ४ वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील”, असं एएनआयशी बोलताना आनंद भोसले म्हणाले.
