चेक बाउन्स प्रकरणामुळे अभिनेता राजपाल यादव सध्या चर्चेत आहे. राजपाल यादव आर्थिक अडचणीत असून २५ लाखांच्या चेक बाउन्स प्रकरणात त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले. आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजपाल यादवने पैसे नसल्याने ओढवलेल्या परिस्थितीबद्दल भावुक वक्तव्य केलं.

न्यूजएक्सच्या वृत्तानुसार, राजपाल यादव या परिस्थितीबद्दल म्हणाला, “सर, मी काय करू? माझ्याकडे पैसे नाहीत. मला दुसरा कोणताही उपाय दिसत नाहीये… सर, आपण सर्वजण इथे एकटे आहोत. मला स्वतःलाच या संकटाचा सामना करावा लागेल.”

प्रकरण नेमकं काय?

२०१० मध्ये राजपाल यादवने ‘अता पता लापता’ नावाच्या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. यामुळे राजपाल यादवचं मोठं नुकसान झालं आणि त्याच्यावर कर्ज झालं. आर्थिक संकटात सापडलेला राजपाल कर्ज फेडू शकला नाही.

राजपालने दिलेले अनेक चेक बाउन्स झाले, ज्यामुळे कर्ज देणाऱ्यांनी कायदेशीर कारवाई केली. एप्रिल २०१८ मध्ये, एका दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नीला कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवलं आणि त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अभिनेत्याने या निकालाला आव्हान दिलं आणि दिलासा मागितला. पण हा खटला अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे थकबाकीची रक्कम व्याजासह जवळपास ९ कोटी रुपये झाली.

कोर्टाने दिले आत्मसमर्पण करण्याचे आदेश

मधल्या काळात राजपाल यादवने त्याचे काही कर्ज फेडले. २०२५ मध्ये त्याने ७५ लाखांचे कर्ज फेडले. पण वारंवार पैसे देण्यास उशीर आणि मुदत चुकवल्यामुळे न्यायालयाने त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्ज फेडण्याबद्दल राजपाल गंभीर नसल्याचं कोर्टाने म्हटलं. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी पैशाची व्यवस्था करण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची राजपाल यादवची विनंती फेटाळून लावली. वारंवार मुदत वाढवून देता येत नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने त्याला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.

राजपाल यादवने भूल भुलैया ३, बेबी जॉन, वनवास, काम चालू है, जंगल, ढोल, वक्त, फिर हेरा फेरी, चूप चूप के, भूल भुलैया, हंगामा, विवश, भूत बंगला, वेलकम टू द जंगल या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.