दिग्गज गायिका आशा भोसले यांचं १२ एप्रिल २०२६ रोजी निधन झालं. त्यांचं भारतीय संगीतातील योगदान येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या लक्षात राहील. आता त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी आशाताईंबरोबर पहिल्यांदा गाणं गाण्याची संधी मिळाल्याची आठवण सांगितली. आशाताई अवघ्या १६ व्या वर्षीगणपतराव भोसले यांच्याबरोबर पळून गेल्या होत्या, त्यानंतर या गाण्याच्या निमित्तानेच दोन्ही बहिणींची पहिली भेट झाली होती. गणपतराव हे आशाताईंपेक्षा जवळजवळ २० वर्षांनी मोठे होते.

आशा भोसले तेव्हा नुकत्याच आई झाल्या होत्या

जवळपास १० वर्षांनंतर आशाताईंना पुन्हा पाहणं किती भावनिक होतं, याबद्दल उषा मंगेशकर ‘फिल्मफेअर’शी बोलताना म्हणाल्या, “लग्नानंतर मी त्यांना पहिल्यांदाच पाहत होते. त्यांनी नुकताच हेमंतला जन्म दिला होता आणि त्या आई झाल्या होत्या. त्या साधारण १४-१५ वर्षांच्या असताना त्यांनी घर सोडलं होतं. आणि इतक्या वर्षांनंतर मी त्यांना पुन्हा पहिल्यांदाच पाहत होते.”

आशाताईंमधील बदल पाहून थक्क झाल्या होत्या उषा मंगेशकर

आशाताईंमध्ये झालेल्या बदलांबद्दल उषा मंगेशकर म्हणाल्या, “पूर्वी मला त्या फक्त एक टॉमबॉय (मुलासारखं वागणाऱ्या) म्हणून आठवत होत्या. त्या पॅन्ट, शर्ट आणि जॅकेट घालायच्या. ७-८ वर्षांच्या असताना सायकल चालवणं, इकडेतिकडे फिरणं आणि भांडणे करतानाच मी त्यांना पाहिलं होतं. त्यामुळे त्या अजूनही तशाच असतील, हसत-खिदळत, प्रत्येकाला चिडवत आणि गमतीत लोकांच्या मागे धावून त्यांना मारत असतील, असंच मला वाटलं होतं. पण त्या माझ्या समोर आल्यावर मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्यांच्या कपाळावर एक मोठी टिकली होती, केस बांधलेले होते आणि त्यांनी साधी पांढरी साडी नेसली होती. हातामध्ये सोन्याच्या बांगड्या आणि घड्याळ होते आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं.”

आशाताई केसांना पिन लावण्यावरून ओरडल्या होत्या…

उषा मंगेशकर यांना पाहताच आशाताई ओरडल्या होत्या. “तिने मला विचारलं, ‘तुझे केस एवढे का विस्कटले आहेत? तुझ्याकडे हेअरपिन नाही का?’ मी पिन लावली नव्हती, त्यामुळे मी फक्त तिच्याकडे पाहतच राहिले. मग तिने मला एक हेअरपिन दिली आणि म्हणाल्या, ‘ही लाव. केस नीट पिन करून येत जा.'” आपली बहीण किती बदलली होती यावर विचार करत उषा पुढे म्हणाल्या, “त्यांच्या बोलण्याची पद्धत खूप बदलली होती. पूर्वी त्या जशा बोलायच्या आणि आता जशा बोलत होत्या, त्यात खूप फरक होता. तिच्यात खूप मोठा बदल झाला होता.”

जेव्हा आशाताईंना आईला फोन केला होता…

आशाताईंनी पळून जाऊन लग्न केल्यामुळे त्यांचं कुटुंबाबरोबचं नातं फार चांगलं नव्हतं. पण मुलगा हेमंतच्या जन्मानंतर परिस्थिती हळूहळू सुधारली. “या काळात खूप काही घडून गेलं होतं. त्यांना मुलगा झाल्यावर माझ्या आईला खूप आनंद झाला होता, कारण तो तिचा पहिला नातू होता. काही दिवसांनंतर आशाताईंनी आईला फोन केला आणि म्हणाल्या, ‘मी आजारी आहे. प्लीज घरी ये.’ तेव्हा मी आईबरोबर गेले होते. त्यानंतर सर्वांचं पुन्हा एकमेकांकडे जाणं-येणं सुरू झालं.”

आशाताई पळून गेल्यामुळे लता मंगेशकर खूप नाराज झाल्या होत्या. कुटुंबातील सर्वात मोठ्या असल्याने लतादीदींचा या लग्नाला विरोध होता. २००३ मध्ये कविता छिब्बर यांना दिलेल्या एका मुलाखतीत आशाताईंनी याबद्दल सांगितलं होतं. “लतादीदी माझ्याशी बरीच वर्षे बोलल्या नव्हत्या. त्यांचा या लग्नाला पूर्ण विरोध होता,” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

आशा भोसले व गणपतराव भोसले १९६० मध्ये वेगळे झाले. त्यांचं १९६६ मध्ये निधन जालं. त्यानंतर आशा यांनी संगीतकार आरडी बर्मन यांच्याशी लग्न केलं. बर्मन यांचं १९९४ मध्ये निधन झालं, तेव्हापर्यंत ते एकत्र राहिले.