Smita Jayakar Gauri Celebrations Jackie Shroff Video: ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या घरातील गौरी नेहमीच खास असतात. जवळपास १७० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आजही त्यांच्या घरात कायम असून यावर्षीही स्मिता जयकर यांनी मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत केले आहे. यावेळी त्यांच्या घरी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावत गौराईची आरती केली. स्मिता जयकर यांनी गौरी-गणपतीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्मिता जयकर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या घरातील गौराईचे मनमोहक रूपातील फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी स्वतः सोनेरी रंगाची जरतारी साडी नेसून त्यासह पारंपरिक नथ व सुंदर असा नेकलेस स्टाइल केला होता. त्यांच्या घरी अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी स्वतः गौराईची आरती केली असून याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

घरी नवसाची गौरी अन् भक्तिमय क्षण – स्मिता

स्मिता जयकर यांच्या गौऱ्या नवसाच्या असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे, त्यामुळे अनेक जण स्मिता जयकर यांच्या घरी गौराईकडे आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी येत असतात. स्मिता जयकर यांच्या घरची गौरी नवसाला पावणारी असल्याची भावना आहे, त्यामुळे नवस फेडण्यासाठीही भाविक मोठ्या उत्साहाने येत असतात. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, “घरी नवसाची गौरी अन् भक्तिमय क्षण… सकारात्मक ऊर्जा आणि सुंदर क्षणांनी भरलेला एक खास अनुभव.”

स्मिता जयकर यांच्या गौराईच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, ‘तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. तुमच्या घरची गौऱ्यांची परंपरा अखंड राहो,’ तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ‘स्मिता, आपण साक्षात गौराई स्वरूप दिसत आहात, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, ‘आम्हाला गौऱ्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर आम्ही येऊ शकतो का?’ अशी विचारणा केली आहे.