ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर यांनी दिवंगत अभिनेत्री पत्नी स्मिता पाटील यांच्या ७१व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि पोस्ट शेअर केली. स्मिता यांच्या असामान्य अभिनयकौशल्य, प्रेमळ स्वभावाबद्दल बोलताना त्यांनी आदरांजली वाहिली.
राज बब्बर यांची दिवंगत पत्नी स्मिता पाटील यांच्यासाठी पोस्ट
स्मिता या विलक्षण कलाकौशल्य असलेल्या कलाकार होत्या, असं म्हणत राज बब्बर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला. स्मिता यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत त्यांनी त्या पात्राच्या आत्म्याला जिवंत केलं, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. इन्स्टाग्रामवर दिवंगत पत्नीचा फोटो पोस्ट करत ते म्हणाले, “स्मिता यांच्यात एक वेगळीच संवेदनशीलता होती. त्यांचा आयुष्याचा प्रवास मोठा नसला, तरी त्यांच्या अभिनयाची छाप कायम मनावर राहिली. त्यांनी फक्त विविध भूमिका केल्या नाहीत, तर त्या खऱ्या वाटतील अशा पद्धतीने साकारल्या. मला त्यांची आठवण येते. त्यांचा प्रेमळ स्वभाव, उत्कृष्ट अभिनय आणि त्यांचे खास गुण आजही आठवतात.”
राज बब्बर पुढे म्हणाले, “स्मिता पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांची आठवण काढत आहे. त्यांचा कलात्मक वारसा आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो, भावुक करतो आणि मनाला भिडतो. कलाकार जेव्हा त्यांना बोलावणं येतं तेव्हा हे जग सोडून जातात, पण स्मिता यांनी आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या मनात स्वतःची खास जागा निर्माण केलेली.”
दरम्यान, स्मिता पाटील या भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी पडद्यावर वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारत फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नाही तर त्यांच्या मनावर त्यांच्या अभिनयाची कायमची छाप सोडली. त्यांचं अभिनय कौशल्य, त्यांचं सौंदर्य आणि कलेप्रती असलेली निष्ठा यासाठी आजही त्यांचं अनेक कलाकार कौतुक करत असतात. आजही अनेक कलाकारांसाठी त्या प्रेरणास्थान आहेत.
