Smita Patil cried after shooting with Amitabh Bachchan: ८० च्या दशकात अमिताभ बच्चन व स्मिता पाटील यांनी एक असा बोल्ड सीन दिला होता, ज्याची त्याकाळी खूप चर्चा झाली होती. बिग बींपेक्षा १२ वर्षे लहान असलेल्या स्मिता पाटील यांनी या बोल्ड सीनचं शूटिंग केलं आणि त्या रात्रभर रडल्या होत्या. स्मिता यांच्या गंभीर भूमिकांपेक्षा ही ग्लॅमरस आणि बोल्ड भूमिका वेगळी होती. प्रेक्षकांना त्यांचा हा सीन फार आवडला होता, पण स्मिता पाटील यांना मात्र याचा प्रचंड पश्चाताप झाला होता.

‘बाजार’, ‘अर्थ’, ‘आक्रोश’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमधून एक गंभीर आणि सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या स्मिता पाटील यांनी १९८२ मध्ये आलेल्या ‘नमक हलाल’ या चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पावसात भिजताना स्मिता यांनी एक अतिशय रोमँटिक आणि ग्लॅमरस सीन शूट केला होता. चित्रपटातील ‘आज रपट जाएं तो…’ या गाण्यातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

गाण्याच्या शूटिंगनंतर स्मिता पाटील रात्रभर रडल्या होत्या

हे गाणं शूट केल्यानंतर स्मिता पाटील यांना प्रचंड पश्चाताप झाला होता आणि त्या रात्रभर रडत होत्या. ‘दैनिक भास्कर डॉट कॉम’च्या रिपोर्टनुसार, पावसात भिजतानाचा अमिताभ आणि स्मिता यांचा हा सीन प्रचंड सेन्सेशनल ठरला होता. या सीनचे शूटिंग संपवून स्मिता घरी गेल्यावर, थेट आपल्या आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांनी समजावल्यावर सेटवर परतल्या होत्या स्मिता पाटील

अमिताभ बच्चन यांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी स्मिता पाटील यांची समजूत काढली. अमिताभ यांनी स्मिता पाटीलला सांगितलं की, त्यांनी या दृश्यामुळे अजिबात अस्वस्थ होऊ नये. कारण ती केवळ कथेची आणि गाण्याची गरज होती. बिग बींनी समजावल्यानंतर स्मिता पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर परतल्या होत्या. पण आपली गंभीर अभिनेत्री म्हणून असलेली प्रतिमा मलिन तर झाली नाही ना, याची काळजी त्यांना सतावत होती.

पुढे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरल्यावर स्मिता पाटील यांना त्यांच्या कामाबद्दल समाधान नक्कीच मिळालं, मात्र भविष्यात पुन्हा कधीही असे बोल्ड सीन्स न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.