Smita Patil Death Untold Stories: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले. बाळंतपणानंतर अवघ्या काही आठवड्यांतच जगाचा निरोप घेणाऱ्या स्मिता यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आजही अनेक चर्चा रंगतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपट निर्मात्या अरुणा राजे यांनी स्मिता यांच्या निधनाच्या त्या रात्री जसलोक हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं होतं, याचा उलगडा केला आहे. राज बब्बर यांच्या प्रेमात असलेल्या स्मिता यांनी समाजाची पर्वा न करता त्यांच्याशी संसार थाटला, पण याच नात्याने त्यांना आयुष्याच्या शेवटी प्रचंड एकाकीपण दिलं होतं, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
स्मिता पाटील यांचे वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी बाळंतपणानंतर निधन झाले. २८ नोव्हेंबर रोजी त्यांनी राज बब्बर यांच्या मुलाला (प्रतीक बब्बर) जन्म दिला होता, परंतु त्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचं तान्हं बाळ मागे राहिलं. स्मिता यांची जवळची मैत्रीण आणि चित्रपट निर्मात्या अरुणा राजे यांनी स्मिता यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणी आणि शेवटच्या क्षणांबद्दल माहिती दिली आहे.
स्मिता यांच्या मृत्यूची ती रात्र
‘ई-टाइम्स’शी बोलताना अरुणा राजे यांनी त्या दुःखद रात्रीच्या आठवणींना उजाळा दिला. स्मिता यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजताच त्या तातडीने जसलोक हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. जवळच राहत असल्याने त्या पटकन तिथे पोहोचल्या, पण तिथे जे पाहिलं ते कधीच त्या विसरू शकणार नाहीत. अरुणा म्हणाल्या, “मी स्मिताला ज्या अवस्थेत पाहिले, ते मी शब्दांत सांगू शकत नाही. मला समजलं होतं की ती आपल्याला सोडून गेली आहे आणि आता ती कधीच परत येणार नाही. तिची आई पूर्णपणे खचली होती, पण लहानग्या प्रतीकासाठी त्यांना स्वतःला सावरण्याशिवाय पर्याय नव्हता.”
स्मिता यांच्या निधनानंतर, त्यांच्या आईने स्मिता यांची काही खासगी पत्रे आणि नोट्स अरुणा राजे यांना दिल्या होत्या. त्या वाचताना अरुणा यांना स्मिता यांची एक हळवी आणि भावनिक बाजू समजली, जी जगापासून कायम लपलेली होती.

स्मिता पाटील यांच्या पत्रांबद्दल अरुणा राजे म्हणाल्या…
स्मिताचं राज बब्बर यांच्यावर किती प्रेम होतं, ते त्या पत्रांमधून दिसत होतं, असं अरुणा राजेंनी सांगितलं. आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “ती राजच्या प्रेमात वेडी होती. सात महिन्यांची गरोदर असताना, डॉक्टरांनी मनाई केली असतानाही तिने राज बब्बर यांच्यासाठी ‘करवा चौथ’चे व्रत केले होते.”
विवाहित राज बब्बर यांच्याशी लग्न केलं, पण स्मिता यांना स्थिर आयुष्य मिळालं नाही. कारण राज यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. ज्या नात्यासाठी सगळ्यांच्या टीकेला सामोऱ्या गेल्या, त्याच नात्यामुळे स्मिता एकाकी पडत गेल्या, याबद्दलही राजे यांनी भाष्य केलें. स्मिता यांनी स्वतःचा मार्ग निवडला असला तरी, त्यामुळे त्या जवळच्या अनेक लोकांपासून दुरावल्या गेल्या होत्या.
“ती खूप एकटी पडली होती. तिचे मित्र आणि कुटुंबीय तिच्यापासून दुरावले, फक्त मीच तिच्या संपर्कात होते. त्या त्यांच्या मनातील कडू आठवणी आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायच्या,” असंही अरुणा राजे यांनी सांगितलं.
