Smriti Irani On Salman Khan Body Shaming Warning: सलमान खानने अभिनेत्रींच्या वाढलेल्या वजनावर प्रतिक्रिया देणाऱ्यांना कठोर शब्दांत सुनावले. यामुळे सिनेविश्वातील अभिनेत्रींचे सोशल मीडियावर होणारे बॉडी शेमिंग हा मुद्दा चर्चेत आला आहे. कतरिना कैफच्या वाढलेल्या वजनावर टीका केल्याने भाईजानने ‘बिग बॉस’च्या ‘विकेंड का वार’मध्ये संताप व्यक्त केला. या मुद्द्यावर आता अभिनेत्री व माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्मृती इराणी सध्या ‘क्योंकि सास भी बहू थी’ मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. याच मालिकेतील सहकलाकारांसह त्यांनी सेटवरील व्हिडीओ शेअर करत शरीरयष्टीवरून ट्रोल करणाऱ्यांना आवाहन केले. पुढे स्मृती इराणी म्हणाल्या, “आमच्या बंधूनो, आमचे एक आवाहन आहे की, कोणाबाबत जर चांगले बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका. आमचे नाही तर किमान सलमान खान सांगतोय त्याचे तरी ऐका. चांगले बोललात तर तुम्हाला चांगले वाटेल.”
काही लोकांनी स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ घेतला – स्मृती इराणी
स्मृती इराणी यांनी रील शेअर करत बॉडी शेमिंगबाबत त्यांचे परखड मत व्यक्त केले. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “सोशल मीडियामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि आपला आवाज ऐकवण्याचा अधिकार मिळाला आहे; ज्यांना आपला आवाज ऐकवण्याची संधी मिळाली नसती त्यांना ती संधी मिळाली. पण, या प्रवासामध्ये काही लोकांनी स्वातंत्र्याचा अर्थ समोरच्याला दुखावणे, त्याची मानहानी किंवा अपमान करणे असा चुकीचा घेतला आहे. सार्वजनिक जीवन जगताना अनेकदा असे सांगितले जाते की, हे सगळे तर या क्षेत्राचा एक भाग आहेच, म्हणजेच-एकतर हे सहन करा किंवा गप्प बसा; पण असे खरंच असले पाहिजे का?”

पुढे त्यांनी लिहिले, “समाजामध्ये काम करत असताना एखाद्या व्यक्तीने त्याचे सन्मानाने जगण्याचे सगळे हक्क सोडून द्यायचे का? एखाद्याचा अपमान करणारी व्यक्ती चेहरा नसलेल्या सोशल मीडिया हँडलमागे लपून असे प्रकार करण्यासाठी निर्भय झाली तर तो अपमान सहन करण्याची अपेक्षा का केली जाते? बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, पण त्याबरोबरच एक जबाबदारीची जाणीवही असावी. मतभेद मांडा, चर्चा करा, टीका करा, प्रश्न विचारा. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींकडून उत्तरांची अपेक्षा करा. पण, हे सर्व करताना मोबाईल स्क्रीनच्या पलीकडेही एक माणूस आहे हे विसरून चालणार नाही.”

पुढे स्मृती इराणी यांनी लिहिले, “सोशल मीडियावर शब्द टाईप करायला फक्त काही सेकंदच लागतात; पण त्यांचा प्रभाव हा खूप काळ राहू शकतो. चांगली व्यक्ती बनण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. पण, आपल्या एका कृतीचा अर्थ समोरच्याच्या आयुष्यात तुमच्या कल्पनेपेक्षाही खूप मोठा असू शकतो.”
