Sneha Ullal shares experience of working with salman khan: शाहरुख खान, अजय देवगण यांच्यासारखे दिसणारे काही चेहरे पाहायला मिळतात. याचबरोबर, ऐश्वर्या रायसारखी दिसणारा एक चेहरा मोठा लोकप्रिय ठरला होता. स्नेहा उल्लाल असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

स्नेहाला हाये रामा रामा हो या गाण्यामुळे तर लोकप्रियता मिळालीच पण, ऐश्वर्या रायसारखी दिसत असल्यामुळे तिची जास्त चर्चा झाली. स्नेहाचा बॉलीवूड किंवा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता. पण, अचानक तिला बॉलीवूडचा भाईजान सलमान खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या या प्रवासाबद्दल सांगितले आहे.

“माझ्या आईला कॅन्सर…”

स्नेहाने नुकतीच अल्फा निऑन स्टुडिओला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “माझी दहावी झाली होती आणि मी कॉलेजला प्रवेश घेतला होता. दरम्यानच्या काळात मला अर्पिता खान(सलमान खानची बहीण)च्या मित्रांनी पाहिलं. त्यावेळी लकी सिनेमासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. त्यांनी सलमान खानला माझ्याबद्दल सांगितलं. त्यानंतर माझ्याशी संपर्क सांधला. त्या वेळी माझं वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी होत्या. माझ्या आईला कॅन्सर झाला होता. त्यावर उपचार सुरू होते. घरात खूप नैराश्याचं वातावरण होतं. त्यामुळे कुटुंबाचं मन दुसरीकडे वळावं म्हणून मी ‘लकी’ सिनेमातील भूमिका स्वीकारली. माझ्या आईला प्रवासाची खूप आवड होती. अभिनयात मला रस होता की नाही माहित नाही. पण, त्या चित्रपटाने माझं आयुष्य बदलून टाकलं.”

अचानक मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल स्नेहा म्हणाली, “लोकांनी मला खूप प्रेम दिलं. पण त्या प्रवासात मी खूप काही गमावलं. माझं स्वातंत्र्य, कॉलेजचं आयुष्य, माझं तारुण्य हे सगळं हरवलं. मी १६ वर्षांची मुलगी होते. पण, मला प्रौढपणे वागावं लागलं आणि हे एका रात्रीत घडलं. त्या वेळी मला त्याची जाणीव नव्हती, पण आता समजतं.” पुढे ती असेही म्हणाली, “सलमान खानने माझी खूप काळजी घेतली.”

“ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाल्यानंतर…”

ऐश्वर्या रायसारख्या दिसण्याबाबत ती म्हणाली, “ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाल्यानंतर अनेक लोक मला त्यांच्यासारखी दिसतेस असं म्हणायचे. नंतर पीआरमुळे आणि सलमान खानबरोबर सिनेमात पदार्पण झाल्यामुळे लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले. पण मी खूप लहान होते, त्यामुळे त्या गोष्टींचा मला फार फरक पडला नाही.”

स्नेहाने सांगितलं की, लहानपणापासूनच तिला जाहिराती आणि चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. “मला लहानपणापासून अनेक ब्रँड्सकडून ऑफर्स यायच्या. पण आम्हाला या इंडस्ट्रीची भीती वाटायची. मी फार ग्लॅमरस नाही, उलट खूप टॉमबॉय स्वभावाची आहे. ‘लकी’नंतर ही अभिनेत्री कुठे गायब झाली असा प्रश्न लोक विचारतात, पण, मला अभिनयातच काम करायचे आहे, याबद्दल मी कधीच ठाम नव्हते. माझ्या कुटुंबातील, जवळचे लोक मला म्हणायचे की ही इंडस्ट्री भीतीदायकआहे. जर मी अभिनेत्री नसते, तर प्राणी आणि पर्यावरणाशी संबंधित व्यवसाय सुरू केला असता. मी प्राणीप्रेमी आणि ॲनिमल ॲक्टिविस्ट आहे. मी अनेक प्राण्यांचे जीव वाचवले आहेत आणि पुढेही हे काम सुरू ठेवणार आहे.”

हिंदी चित्रपटांमध्ये अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर स्नेहाने तेलुगू, कन्नड आणि बंगाली चित्रपटांत काम केले. आता ती ३८ वर्षांची आहे. आता अभिनेत्रीला पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करायचे आहे. याबद्दल ती म्हणाली, “मी पुन्हा बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न करतेय. मी पुन्हा बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहे.”

अभिनेत्री लवकरच, तेलुगु सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.