Saif Ali Khan Amrita Singh Secret Wedding Details: सैफ अली खानचं पहिलं लग्न खूप चर्चेचा विषय ठरलं होतं. कारण १९९१ साली काही दिवसांच्या अफेअरनंतर अवघ्या २१ वर्षांच्या सैफ अली खानने ३३ वर्षांच्या अमृता सिंगशी थेट लग्न केलं होतं. लग्न अशा परिस्थितीत झालं होतं की सैफ किंवा अमृताच्या कुटुंबातील कोणीही लग्नाला उपस्थित नव्हतं. सैफच्या बहिणी सोहा अली खान आणि सबा तेव्हा शाळेत होत्या. त्यांना वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर या लग्नाबद्दल समजलं होतं. तसेच या लग्नाविषयी कोणाशीही काहीच बोलायचं नाही, असंही त्यांना बजावण्यात आलं होतं. सोहा व सबा यांनी सैफच्या पहिल्या लग्नाची आठवण सांगितली.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्याशी बोलताना सबा म्हणाली, “आम्ही शाळेत असताना त्याचं लग्न झालं होतं.” त्यावेळी सबा १५ वर्षांची होती आणि सोहा १३ वर्षांची होती. “आम्हाला प्रिन्सिपलच्या ऑफिसमधून फोन आला. आई-वडिलांनी सांगितलं होतं की तुम्ही कोणालाही काहीही सांगायचं नाही. ती बातमी वर्तमानपत्रात आली होती, त्यामुळे ती कितपत खरी आहे हे आम्हालाही माहिती नव्हतं. त्यामुळेच कोणालाही काहीही सांगायचं नाही, असं आम्हाला बजावलं होतं,” असं सबाने सांगितलं.
सैफच्या लग्नाला त्याच्या बहिणी गेल्या नव्हत्या हे ऐकून नेहाला धक्का बसला. यावर सोहा म्हणाली, “आम्ही तेव्हा खूप लहान होतो आणि मला आठवतंय की माझ्या फ्रेंच शिक्षकांनी मला याबद्दल सांगितलं होतं. त्यांनी कोणालाही न सांगता अचानक लग्न केलं होतं.”
लग्नाआधी एकत्र राहत होते सैफ व अमृता
फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी अमृता आणि सैफच्या या अचानक झालेल्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. कारण ते दोघेही साक्षीदार म्हणून या लग्नाला हजर होते. “आम्ही त्यांच्या निकाहनाम्यावर साक्षीदार म्हणून सही केली होती. एके दिवशी ते दोघे आमच्याकडे आले आणि म्हणाले, ‘आम्हाला आताच लग्न करायचंय!’ सैफ लग्नासाठी तयार होता, पण अमृता गोंधळलेली होती. दोघे प्रेमात होते आणि सैफ तिच्यासोबतच राहत होता. ते ६-८ महिने ते एकत्र राहत होते. सैफ तयार होता, पण ती हो-नाही करत होती,” असं ते म्हणाले होते.
लग्नात अमृताचं नाव बदलून अझीझा ठेवलं होतं
या लग्नासाठी एक एक भटजी व एक मौलवी आले होते. “वेळ नसल्यामुळे अमृताला जे कपडे मिळाले त्यातच ती तयार झाली, तिच्या आईचे काही उत्तम दागिने तिच्याकडे होते ते तिने घातले होते. तर सैफने शेरवानी घातला होता. तेव्हा मौलवी म्हणाले, ‘तुझं नाव काय आहे? तुझे नाव ‘A’ (अ) अक्षरावरून सुरू व्हायला हवं.’ आम्ही चौघे एकमेकांकडे पाहू लागलो, कोणीतरी ‘अझीझा’ हे नाव सुचवलं. ते लग्न खूपच घाईत झालं होतं. घरी परतताना अमृताच्या आईचा फोन आला… पण नंतर त्यांनी ही गोष्ट स्वीकारली.”
सैफ-अमृताच्या लग्नाबद्दल समजताच रडल्या होत्या शर्मिला टागोर
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सैफ आणि त्याची आई शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी सैफच्या अमृताबरोबरच्या लग्नाविषयी भाष्य केलं होतं. सैफने आईला स्वतः भेटून लग्नाबद्दल सांगितलं होतं. “तो म्हणाला, ‘मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे’ आणि नंतर त्याने मला सांगितलं. मला समजतच नव्हतं की मी काय करू, मी शांत होते. सैफ म्हणाला, ‘अम्मा, तुमचा चेहरा पांढरा पडतोय, तुम्ही अशा का दिसत आहात.’ मी म्हटलं, ‘ठीक आहे, आपण यावर नंतर बोलू, आत्ता नको.’ तो गेल्यावर मी टायगरला (सैफचे वडील) फोन करून सांगितलं. तिकडेही काही वेळ शांतता होती. आम्ही विषय तिथेच सोडला आणि मी म्हणाले, ‘मला तिला भेटायला आवडेल’,” असं शर्मिला टागोर यांनी सांगितलं होतं. नंतर शर्मिला व त्यांच्या पतीनेही सैफ-अमृताचं नातं स्वीकारलं.
दरम्यान, सैफ आणि अमृताचा संसार १३ वर्षांनंतर मोडला. त्यांना सारा अली खान ही मुलगी आणि इब्राहिम अली खान हा मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. २०१२ मध्ये सैफने अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं. त्यांना तैमूर अली खान व जेह अली खान ही दोन मुलं आहेत. अमृताने नंतर कधीही दुसरं लग्न केलं नाही आणि मुलांचा सांभाळ केला.
