Soha Ali Khan Shares Morning Drink Recipe : अलीकडे अनेक कलाकार मंडळी फिट राहण्यासाठी जिम, योगा किंवा विविध प्रकारचे व्यायाम करतात. याबद्दलची अपडेट ते आपल्या चाहत्यांना देत असतात. तसेच फिट राहण्यासाठी लागणाऱ्या डाएटद्दलची माहितीसुद्धा कलाकार आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. अशीच फिटनेसबद्दलची माहिती देणारी अभिनेत्री म्हणजे सोहा अली खान.

सोहा अली खान सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे स्टायलिश फोटो-व्हिडीओ शेअर करण्याबरोबरचे फिटनेसबद्दल माहितीपर व्हिडीओसुद्धा शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने सकाळी आरोग्यासाठी फायदेशीर अशा घरगुती पेयाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सोहाने तिच्या सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ शेअर केला आहे. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांच्या काळात दिवसाची सुरुवात शांत पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे, हे या व्हिडीओतून तिने सांगितले आहे. तसेच हे पेय कसं बनवायचं, याची रेसिपीसुद्धा तिने शेअर केली आहे.

Award Banner

व्हिडीओ शेअर करत सोहा म्हणते, “मी कधीच सकाळी लवकर उठणारी व्यक्ती नव्हते. ‘कॉफी पिल्याशिवाय माझ्याशी बोलू नका’, अशा स्वभावाची मी होते. पण अचानक मला जाणवले की, मी रिकाम्या पोटी कॉफी घेऊ शकत नाही. पेरीमेनोपॉजमुळे शरीरात अनेक बदल होत होते. त्यामुळे मी कोमट पाणी, लिंबू, आले आणि चिया सीड्स असलेले पेय पिण्यास सुरुवात केली. खरं सांगायचं तर, हे माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरले आहे.”

तिने पुढे स्पष्ट केले की, पेरीमेनोपॉज दरम्यान ॲसिडिटी, पोट फुगणे आणि कॅफिनची संवेदनशीलता वाढू शकते. हे पेय शरीराला हायड्रेट करते, पचन सुधारते आणि कॉफीसारखा झटका न देता शरीराला स्थिर ऊर्जा देते.

हे पेय कसे बनवायचे? पाहा रेसिपी

सोहाचे हे ड्रिंक बनवायला अतिशय सोपे आहे. यासाठी अर्धा ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. मग एक चिमूटभर गुलाबी मीठ (सेंधव मीठ) टाका. त्यात थोडी हळद आणि काळी मिरी पूड मिसळा. पुढे रात्रभर भिजवलेले चिया सीड्स त्यात टाका. त्यानंतर वरुन किसलेले ताजे आले घाला. हे सर्व नीट ढवळून घ्या आणि एक मिनिट तसेच राहू द्या. नंतर हळूहळू त्याचे घोट घ्या.

सोहाने सांगितलेले पेय फायदेशीर का?

सोहाच्या मते, यातील प्रत्येक घटकाचे स्वतःचे महत्त्व आहे. लिंबू आणि आले पचन सुधारण्यास मदत करतात, तर चिया सीड्समधील फायबर पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. हळदीमध्ये दाहशामक (Anti-inflammatory) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे पोट फुगणे कमी करण्यास आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळवून देण्यास मदत करतात.

दरम्यान, या पेयाची रेसिपी देण्याबरोबर सोहाने एक सूचनासुद्धा दिली आहे, ती म्हणते, “जर तुम्हाला गिळण्याचा त्रास असेल किंवा पोटाच्या समस्या असतील तर हे पेय टाळा. तसेच याने मला गुण आला आहे, पण प्रत्येकाला तेच लागू होईल असं नाही. विशेषतः ॲसिडिटी, किडनी स्टोन किंवा संवेदनशील पोट असेल; तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या.”

सूचना – वरील माहिती अभिनेत्री सोहा अली खानच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक ठेवण, आरोग्य आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे हे पेय घेण्याआधी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. आरोग्यासंबंधित बदल हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत.