Soha Ali Khan Shared Morning Smoothie Recipe : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फिटनेस फ्रीक आहेत. त्यांच्या आरोग्याची ते खूप काळजी घेतात आणि नियमीत व्यायाम करतात. डाएट रूटीन फॉलो करतात. यापैकीच एक म्हणजे सोहा अली खान. सोहा अली खान तिच्या फिटनेसची खूप काळजी घेताना दिसते.

सोहा अली खान अनेकदा जिमला जाताना स्पॉट होत असते. अनेकदा तिला पापाराझी जिमच्या बाहेर स्पॉट करतात. तिचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोहा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी यामार्फत चाहत्यांसह शेअर करत असते. यामार्फत ती जे पदार्थ खाते आणि जे पेय पिते, त्यांचे व्हिडीओ बनवून ती पोस्ट करत असते. अशातच आता तिनं ती सकाळी उठल्यानंतर काय खाते याबद्दल सांगितलं आहे.

सोहानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती तिच्यासाठी स्मूदी बनवताना दिसत आहे. त्याशिवाय तिच्या दिवसाची सुरुवात होत नाही, असं तिनं म्हटलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमधून तिनं या स्मूदीची रेसिपी सांगितली आहे आणि व्हिडीओमधून ती कशी बनवली जाते त्याची माहितीसुद्धा दिलीये.

Award Banner

सोहानं सांगितली खास स्मूदीची रेसिपी

सोहा याबद्दल म्हणाली, “हा माझा रोजचा स्मूदी आहे. त्याशिवाय माझी सकाळ सुरूच होत नाही. हे एक साधं प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स यांनी भरलेलं मिश्रण आहे. त्यात सुमारे ३०-३५ ग्रॅम प्रोटीन असतं. अँटिऑक्सिडंट्स शरीराच्या एकूण आरोग्याला मदत करतात. त्वचा, पेशी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. अलीकडेच मी Plix Yeast Protein वापरायला सुरुवात केली आणि मला खरोखर फरक जाणवला. पोट हलकं वाटतं आणि पचन खूप सोपं झालं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनमध्ये यीस्ट प्रोटीन माझ्यासाठी सहज पचणारे ठरले आहे.”

सोहानं पुढे रेसिपीसुद्धा सांगितली आहे. केळी, स्ट्रॉबेरी, काजू, बदाम, ओट्स, दूध आणि इतर काही पदार्थांपासून ती ही स्मूदी बनवत असल्याचं दिसत आहे. या सगळ्याचं ती मिश्रण करून पिताना दिसते. ती याबद्दल पुढे म्हणाली, “मी हा स्मूदी साधारण नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी घेते. त्यामुळे पचन सुधारायला मदत होते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.”

दरम्यान, सोहा अली खान अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी सोशल मीडियावरून शेअर करत असते. प्रत्येक पदार्थ आणि त्यातील फायदे ती सांगत असते. शरीरासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थच ती बनवताना दिसते. व्यायाम आणि पौष्टिक आहार यांकडे तिचा कल अधिक असल्याचं दिसतं आणि हेच तिच्या फिटनेसचं रहस्य असावं.